Prateik Smita Patil comment on his drug addiction : दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील व ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक स्मिता पाटीलने त्याच्या ड्रग्जच्या व्यसनाबद्दल सांगितलं आहे. प्रतीकने ‘जाने तू… या जाने ना’ (२००८) हा चित्रपट केला, तेव्हा तो फक्त २२ वर्षांचा होता. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर, तो मुंबईतील व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनलमध्ये शिकायला गेला. पण चित्रपट निर्माते सुभाष घई यांच्या या अभिनय इन्स्टिट्युटमधून त्याला काढून टाकण्यात आलं होतं. प्रतीकचं ड्रग्जचं व्यसन यासाठी कारणीभूत ठरलं होतं.

बॉलीवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत प्रतीकने सांगितलं की व्यसनामुळे त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावर मोठा परिणाम झाला आणि आता या गोष्टीचा त्याला खूप पश्चात्ताप आहे. तो म्हणाला, “मी खूप वाईट निर्णय घेतले. मी असं म्हणणार नाही की मी वेगळं काहीतरी करू शकलो असतो, कारण मी खूप लहान असल्यापासूनच असा होतो. मग मी पुन्हा दारू आणि अंमली पदार्थांच्या आहारी गेलो. मी माझ्या कमकुवतपणाला बळी पडलो. माझ्याकडे व्यसन करण्यासाठी पुरेशी कारणं होती. आता आपण त्या गोष्टींबद्दल बोलतो तेव्हा गोष्टी जितक्या क्लिष्ट वाटतात, त्यापेक्षा खूपच गुंतागुंतीच्या त्यावेळी होत्या. पण त्या निर्णयांमुळे माझ्या करिअरमध्ये आणि वैयक्तिक आयुष्यात मोठं नुकसान झालं.”

आजी-आजोबांना त्रास दिल्याचा पश्चाताप – प्रतीक

प्रतीकला जन्म दिल्यानंतर दोन आठवड्यांनी त्याची आई स्मिता पाटीलचं निधन झालं. आई गेल्यानंतर प्रतीकला त्याच्या आजी-आजोबांनी (स्मिताचे आई-वडील) वाढवलं. पण त्यांना खूप त्रास दिल्याचा आता प्रतीकला पश्चात्ताप आहे. “त्यांच्या जाण्याआधीच्या शेवटच्या काही वर्षांत आजी-आजोबांनी मला सर्वात वाईट अवस्थेत पाहिलं. मी व्यसनी होतो. मला व्यसनाधीन पाहूनच माझी आजी वारली, याचा मला पश्चात्ताप आहे. आज मी जसा आहे तसं मला तिने पाहिलं असतं तर बरं झालं असतं,” असं प्रतीक म्हणाला.

ड्रग्जच्या व्यसनाचा आयुष्यावर कसा परिणाम झाला याबद्दल प्रतीकने सांगितलं. त्याला अनेक शाळा आणि महाविद्यालयांमधून काढून टाकण्यात आलं होतं, असा खुलासा त्याने केला. त्यापैकी एक कॉलेज चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई यांचे होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
prateik babbar was drug addict
प्रतीक स्मिता पाटील (फोटो- इन्स्टाग्राम)

मी उपद्रवी होतो – प्रतीक

“मी ‘जाने तू’ या चित्रपटाचं शूटिंग केलं आणि मग व्हिसलिंग वुड्समध्ये गेलो. मी थोडाफार अभ्यास करत होतो. पण त्याबद्दल उत्साह नव्हता, कारण मी काय करतोय हे मला माहीत नव्हतं. मी तिथे २ वर्षे होतो आणि नंतर ड्रग्ज घेतल्याने मला व्हिसलिंग वुड्समधून बाहेर काढण्यात आलं. आता जेव्हा मी त्याबद्दल विचार करतो तेव्हा मला हसायला येतं. मी ज्या ज्या शाळेत आणि कॉलेजमध्ये गेलो तिथून मला हाकलून लावण्यात आलं. कारण मी उपद्रवी होतो.”