उद्योगपती व अभिनेत्री करिश्मा कपूरचे एक्स पती संजय कपूर यांचं १२ जून २०२५ रोजी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर संपत्तीबद्दल वाद सुरू झाला आहे. करिश्मा कपूरची मुलं व संजय कपूरच्या बहिणी प्रिया सचदेव (संजय कपूरची तिसरी पत्नी) हिच्यावर आरोप करत आहेत. पतीच्या निधनानंतर प्रियाने पहिली पोस्ट केली आहे. आज (१५ ऑक्टोबर) संजय कपूर यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने प्रिया पतीच्या आठवणीत भावुक झाली.

प्रिया सचदेवने इन्स्टाग्रामवर संजय कपूर यांना श्रद्धांजली वाहणारा एक हृदयस्पर्शी व्हिडीओ शेअर केला. व्हिडीओमध्ये प्रिया, संजय त्याचबरोबर करिश्मा कपूरची मुलगी समायरा व मुलगा कियान हे सर्वजण दिसत आहेत.

प्रियाने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये भगवद्गीतेतील काही ओळी लिहिल्या आहेत. “एक महान माणूस जे काही करतो, त्याचे इतर अनुकरण करतात. तो ज्या मार्गावर चालतो, त्याचे जग अनुकरण करते. जो विशिष्ट उद्देश आणि प्रेमाने जगतो तो कधीही नष्ट होत नाही, कारण जे भक्तीने सेवा करतात त्यांच्यात देव असतो.”

पुढे प्रियाने लिहिलं, “तुम्ही अशाच रितीने जगलात, याबद्दल बोलायची कधी गरज भासली नाही. तुम्ही आज्ञा देऊन नाही तर प्रेमाने नेतृत्व केलं. तुम्ही अभिमानाने नाही तर धैर्याने हे सगळं कमावलं. तुम्ही कोणतीही अपेक्षा न ठेवता सर्वांना खूप काही दिलं, कारण तुमचा स्वभाव तसा होता.”

प्रिया पुढे म्हणाली, “मी तुम्हाला अनेक आव्हानांमधून नम्रपणे पुढे जाताना, शांततेने जबाबदाऱ्यांचे ओझे वाहताना पाहिलंय. तुम्ही कधीही विश्वासाबद्दल बोलला नाही, तुम्ही विश्वासाने जगलात. तुम्ही घोषणा करण्यावर नव्हे तर कृती करण्यावर विश्वास ठेवला. आजही, तुमची उपस्थिती मला माझ्या शेजारी एक शांत शक्तीसारखी जाणवते. आमच्या मुलाच्या हास्यात जाणवते. तुम्ही दूरदृष्टीने बांधलेल्या भिंतींमध्ये जाणवते. संध्याकाळच्या शांततेत जिथे मला तुमची शांती जाणवते.”

पाहा व्हिडीओ

“असं म्हणतात की एका महान माणसाच्या कृती जगाला मार्गदर्शन करतात, पण माझ्यासाठी, तुमची सर्वात मोठी कृती म्हणजे तुम्ही निस्वार्थपणे प्रेम केलं. काही आत्मा कधीच आपल्यातून जात नाहीत, त्या सर्वत्र असतात. तुम्ही सगळीकडे आहात आणि तरीही इथे आहात. संजय, मला माहित आहे की तुमचं माझ्यावर लक्ष आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा, जे,” असं प्रिया सचदेवने लिहिलं.

प्रियाने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये करिश्मा कपूर दिसत नाहीये, पण तिची मुलं समायरा आणि कियान दिसत आहेत. प्रियाने तिच्या सासू राणी कपूर यांच्याबरोबरचे काही फोटोही शेअर केले आहेत. व्हिडीओच्या शेवटी प्रिया संजय कपूर यांच्या फोटोसमोर हात जोडताना दिसतेय.