उद्योजक व करिश्मा कपूरचे एक्स पती संजय कपूर यांचे १२ जून २०२५ रोजी निधन झाले. त्यांच्यावर १९ जूनला दिल्लीत अंत्यसंस्कार झाले. घटस्फोट झाला असला तरी करिश्मा संजय कपूर यांच्या अंत्यसंस्काराला व प्रार्थना सभेला गेली होती. प्रार्थना सभेत ती संजय कपूर यांची तिसरी पत्नी प्रिया सचदेवला धीर देताना दिसली. याचदरम्यान, प्रिया सचदेव हिची एक जुनी मुलाखत पुन्हा चर्चेत आहे.
प्रियाने मुलाखतीत पती संजय कपूरबद्दल लोकांना गैरसमज असल्याचं म्हटलं होतं. वडिलांचं निधन आणि त्यानंतर करिश्माबरोबर घटस्फोट झाल्याने संजय कपूर यांना खूप आव्हानांचा सामना करावा लागला, असं प्रिया म्हणाली होती. तसेच संजय कपूर यांच्या व्यावसायिक निर्णयांमध्ये तिचा सहभाग आणि त्यांच्या पोलो खेळाच्या आवडीबद्दलही तिने सांगितलं होतं.
लंडनमध्ये एका पोलो सामन्यादरम्यान ५३ व्या वर्षी संजय कपूर यांचे हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले. संजय यांनी करिश्मा कपूरपासून घटस्फोट घेतल्यानंतर दिल्लीतील मॉडेल प्रिया सचदेवशी लग्न केलं होतं. आता, प्रियाची एक जुनी मुलाखत पुन्हा चर्चेत आहे, या मुलाखतीत तिने संजय कपूरबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या.
संजय यांच्या वडिलांचं निधन, करिश्मापासून घटस्फोट
किन अँड काइंडनेस या युट्यूब चॅनलवरील मुलाखतीत प्रिया संजय कपूरबरोबरच्या तिच्या नात्याबद्दल व्यक्त झाली होती. २०१५ मध्ये जेव्हा ते एकत्र आले तेव्हा संजय त्यांच्या वडिलांच्या निधनाने खचले होते. तसेच अचानक जर्मनीतील व्यवसाय सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली होती, त्यामुळे ते एकटे ते जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करत होते. संजय यांच्या व्यावसायिक आयुष्यात सक्रिय भूमिका बजावत असल्याचं प्रिया म्हणाली होती. अनेकदा ती त्यांच्याशी व्यावसायिक गोष्टींबद्दल चर्चा करत असे आणि महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सहभागी होत असे.
संजय कपूर यांच्या आव्हानात्मक प्रवासाबद्दल प्रिया म्हणाली होती की त्यांचे वडील वडील सुरिंदर कपूर हे भारतातील ऑटो कंपोनेंट उद्योगातील एक महत्त्वाचे व्यक्ती होते. त्यांच्या निधनानंतर संजय यांना कौटुंबिक व्यवसायाची जबाबदारी घ्यावी लागली. त्याच काळात त्यांचा घटस्फोट झाला. वडिलांचं निधन, व्यवसायाची जबाबदारी व घटस्फोट या गोष्टी एकाचवेळी घडत असताना संजय कपूर यांनी सर्व कसं हाताळलं आणि यशस्वी उद्योजक कसे झाले, ते प्रियाने सांगितलं होतं.
संजय यांचा प्रामाणिकपणा पाहून त्यांच्याकडे आकर्षित झाल्याची कबुली प्रिया सचदेवने दिली होती. संजयबद्दल लोकांना बरेच गैरसमज आहेत. ज्या पद्धतीने संजय यांनी वडील सुरिंदर कपूर यांच्या निधनानंतर व्यवसाय सांभाळून त्यात यश मिळवलं, त्याचा फार अभिमान वाटतो. त्यांनी काही कठीण निर्णय घेतले असले तरी, बहुतांशी निर्णयांचे सकारात्मक परिणाम झाले, असं प्रिया म्हणाली होती.
संजय कपूर यांची पोलोची आवड
संजय यांना पोलोची आवड होती. पोलो खेळ त्यांच्या व कुटुंबियांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग होता, असं प्रियाने म्हटलं होतं. दरवर्षी, पोलो सीझनमध्ये संजय कपूर, प्रिया व त्यांची मुलं काही महिन्यांसाठी इंग्लंडला राहायला जायचे. संजय कपूर प्रोफेशनल पोळो खेळाडू असल्याचंही प्रियाने नमूद केलं होतं.
दरम्यान, संजय कपूर यांनी नंदिता महतानीशी घटस्फोट झाल्यावर २००३ साली करिश्मा कपूरशी लग्न केलं. या जोडप्याला समायरा व कियान ही दोन अपत्ये आहेत. त्यानंतर संजय यांनी प्रिया सचदेवशी तिसरं लग्न केलं होतं. डिसेंबर २०१८ मध्ये या जोडप्याला मुलगा झाला. प्रियाला तिच्या पहिल्या लग्नापासून एक मुलगी असून ती त्यांच्याबरोबरच राहते.