बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार व इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत असलेला ‘सेल्फी’ हा चित्रपट २४ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. कॉमेडी ड्रामा असलेल्या अक्षय कुमारच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. २०२३ या नववर्षातील खिलाडी कुमारचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे प्रेक्षकांनाही अक्षयच्या या चित्रपटाकडून अपेक्षा होत्या. पण हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षेस खरा उतरला नसल्याचं चित्र आहे.

अक्षय कुमारच्या ‘सेल्फी’ चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिसवरील आकडे समोर आले आहेत. या चित्रपटाला प्रदर्शनाच्या दिवशी काही खास कामगिरी करता आलेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, ‘सेल्फी’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवशी बॉक्स ऑफिसवर केवळ तीन कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे ‘सेल्फी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरल्याचं चित्र आहे. आता वीकेंडला हा चित्रपट किती कमाई करतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. खुद्द अक्षय कुमारनेदेखील चित्रपट फ्लॉप होण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली आहे.

आणखी वाचा : ‘चंद्रमुखी’नंतर ‘कलावती’च्या देखण्या लूकमध्ये अमृता खानविलकर; संजय जाधव दिग्दर्शित चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित

सोशल मीडियावर सध्या अक्षय कुमारला चांगलंच ट्रोल केलं जात आहे. तरण आदर्शसारख्या ट्रेड एक्स्पर्टनीसुद्धा हा चित्रपट अपयशी ठरल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. एकीकडे सगळे अक्षय कुमारवर खापर फोडत असताना निर्माती आणि दिग्दर्शिका एकता कपूर हिने मात्र अक्षय कुमारची बाजू घेतली आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत तिने लिहिलं की, “अक्षय कुमारसारख्या विश्वसनीय अभिनेत्याबरोबर काम करायला मिळणं हे फार भाग्याचं आहे. एखाद्या व्यक्तीला मुद्दाम खाली ओढणं हे अत्यंत विकृत मानसिकता आहे. हे फारच असंवेदनशील आहे.”

ekta kapoor post
ekta kapoor post

‘सेल्फी’ हा चित्रपट एकूण १५० कोटींच्या बजेटमध्ये तयार झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग करेल, अशी अपेक्षा होती. ‘सेल्फी’ चित्रपटात अक्षय कुमार व इमरान हाश्मीसह नुसरत भारुचा व डायना पेंटी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. अक्षय कुमारचे एकापाठोपाठ एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरत आहेत. २०२२ मध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असलेले ‘राम सेतू’, ‘रक्षाबंधन’, ‘बच्चन पांडे’ व ‘सम्राट पृथ्वीराज’ हे चित्रपटही फ्लॉप ठरले होते.