Rahul Bhatt on Aamir Khan: बॉलीवूड अभिनेता आमिर खान लवकरच त्याच्या ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असल्याचे दिसत आहे. आमिर खानने आतापर्यंत अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यामध्ये दंगल या चित्रपटाने प्रामुख्याने नाव घेतले जाते.
‘दंगल’ या चित्रपटात अभिनेत्याने गीता-बबीता फोगाट यांच्या वडिलांची भूमिका साकारली होती. त्याचे वय जास्त दिसावे यासाठी अभिनेत्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. त्याला वजन वाढवावे लागले. या चित्रपटासाठी त्याला फिटनेस ट्रेनर व अभिनेता राहुल भट्टने ट्रेनिंग दिले. नुकत्याच एका मुलाखतीत राहुल भट्टने आमिर खानबाबत वक्तव्य केले आहे.
राहुल भट्ट काय म्हणाला?
राहुल भट्टने ‘हिंदी रश’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत आमिर खानबाबत राहुल भट्ट म्हणाला, “आमिर खूप उत्साही, महत्त्वाकांक्षी व खूप चांगला निरीक्षक आहे. योग्य कामासाठी योग्य माणूस ओळखणे आणि नंतर त्याला त्याचे काम करू देणे यावर त्याचा विश्वास आहे. आमिर खान त्याच्या कामाप्रति प्रामाणिक आहे. तो सकाळी ४.१५ ला जिममध्ये येत असे. आमिर खान त्याच्या एका वक्तव्यामुळे वादात सापडला होता. आम्ही लुधियानामध्ये शूटिंग करीत होतो. त्यादरम्यान त्याने मला भारतात असुरक्षित वाटते, असे विधान केले होते. त्यामुळे तो मोठ्या वादात अडकला.
“आम्ही राहत होतो त्या हॉटेलबाहेर गर्दी झाली. आंदोलन सुरू झाले. स्थानिकांनी जी व्यक्ती आमिर खानला कानाखाली मारेल, त्याला एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. इतका गोंधळ सुरू असूनही आमिर खानने त्याच्या कामावर लक्ष केंद्रित केले. त्याने धूम्रपान केले नाही. मला वाटले की, अशा वातावरणात तो डाएटकडे दुर्लक्ष करील. आइस्क्रीम खाईल किंवा व्यसन करील; पण असे काहीही घडले नाही.”
“आमिर खान त्यावेळी म्हणाला होता की, हे काही दिवस चालू असेल. काही दिवसांनंतर हे सर्व बंद होईल. मी याआधी हे सगळं पाहिलं आहे. इतक्या काळजीच्या वातावरणात तो शांत होता.” असे राहुल भट्टने सांगितले. २०१५ मध्ये आमिर खानने भारतात असहिष्णुता वाढली असल्याने भारतात असुरक्षित वाटते, असे विधान केले होते. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.
काही दिवसांपूर्वीच आमिर खानने एका मुलाखतीत नितेश तिवारींनी जेव्हा पहिल्यांदा त्याला या भूमिकेबाबत विचारले, तेव्हा त्याने नकार दिला होता. कारण- त्याने त्याआधी धूम ३ चे शूटिंग केले होते. त्या चित्रपटासाठी त्याने वजन कमी केले होते आणि दंगल चित्रपटात त्याला वय आणि वजन जास्त असणारी भूमिका साकारायची होती. त्यामुळे सुरुवातीला त्याने नकार दिला. पुढे त्याने असेही म्हटले होते की, मी नितेशला गमतीने म्हणालो की, मला वाटते की, सलमान आणि शाहरुख खानने तुम्हाला पाठविले आहे आणि सांगितले आहे की, याला ६० वर्षांच्या म्हाताऱ्याची भूमिका द्या आणि याला इंडस्ट्रीमधून बाहेर काढा.
दरम्यान, दंगल चित्रपट बॉलीवूडमधील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला.