८० च्या दशकात जितेंद्र, सनी देओल, विनोद खन्ना, गोविंदा यासारख्या डॅशिंग अभिनेत्यांबरोबरच आणखी एका नटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं ते म्हणजे राज बब्बर. आपल्या हटके चित्रपटांसाठी खासकरून नकारात्मक भूमिकांमुळे राज बब्बर यांना चित्रपटसृष्टीत स्वतंत्र अशी ओळख मिळाली. झीनत अमानबरोबरच्या ‘इन्साफ का तराजू’ या चित्रपटातून राज बब्बर यांना लोकप्रियता मिळाली.

त्यानंतरही राज बब्बर यांचे वेगवेगळे चित्रपट आले अन् प्रेक्षकांच्या ते पसंतीसही पडले. फिल्मी करिअर उत्तम सुरू असताना ८० च्या दशकातच राज बब्बर यांनी राजकारणात प्रवेश करायचा निर्णय घेतला. या निर्णयाचा त्यांना अजिबात पश्चात्ताप नाही याचा त्यांनी नुकताच खुलासा केला. ‘राजश्री’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या या निर्णयाबद्दल राज बब्बर यांनी मानमोकळेपणाने आपली बाजू मांडली.

आणखी वाचा : सैफ अली खानच्या मुलासाठी अनोख्या पद्धतीने करण जोहरने केली चित्रपटाची घोषणा; प्रेक्षकांनाच विचारले ‘हे’ प्रश्न

राज बब्बर म्हणाले, “मला आधीपासूनच समाजकार्यात रस होता. त्यामुळे यासाठी राजकारणासारखा उत्तम मंच मला मिळणार नाही असा माझा समज होता, अन् मला माझा आवाज लोकांपर्यंत पोहोचवता येईल असंही वाटायचं. मला याचा अजिबात पश्चात्ताप नाही, कदाचित मी या क्षेत्रात आणखी बक्कळ पैसा कमावू शकलो असतो जे मी अजिबात केलं नाही. बहुतेक ही परमेश्वराचीच इच्छा होती.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे राज म्हणाले, “माझे आजोबा आणि वडील दोघेही रेल्वेमध्ये कामाला होते, ते क्वार्टरमध्येच राहायचे. मी माझं बरंचस आयुष्य भाड्याच्या घरात राहून काढलं, पण मी माझं पहिलं घर मुंबईत घेतलं होतं. मला कधीच कुठली उणीव भासली नाही, हा मार्ग मी निवडला होता.” याबरोबरच चित्रपटातही काम करण्याबद्दल राज बब्बर यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, “मला अजूनही काम करायचं आहे. मी ‘बॉडीगार्ड’,’ बुलेट राजा’, ‘फॅशन’सारख्या चित्रपटात काम केलं आहे. ओटीटीवरील काही वेबसिरीजमध्येही मी काम केलं आहे. जोवर माझ्या जीवात जीव आहे तोवर मी काम करत राहणार.”