Kedar Sharma Talked About Raj Kapoor : केदार शर्मा हे ९० च्या काळातील बॉलीवूडमधील मोठं नाव. ते दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते व गीतकार होते. त्यांनी अनेक कलाकारांना इंडस्ट्रीत लाँच केलेलं, जे पुढे जाऊन बॉलीवूडमधील स्टार झाले. गीता बाली, मधुबाला, भारत भूषण आणि अशा इतर अनेक कलाकारांचा त्यामध्ये समावेश आहे. केदार शर्मा यांनी राज कपूर यांच्याबरोबरही काम केलेलं. परंतु, त्यांच्यामध्ये सुरुवातीला फार चांगले संबंध तयार झाले नव्हते. केदार शर्मा पाकिस्तानहून कोलकातामार्गे मुंबईत आले आणि इथेच स्थायिक झाले होते. त्यांनी ‘नील कमल’, ‘बावरे नैन’, ‘जोगन’ यांसारखे चित्रपट बनवले होते.
‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार केदार शर्मा यांनी राज कपूर यांची चित्रपटात निवड करण्यापूर्वी त्यांना त्यांचे मित्र पृथ्वीराज कपूर यांनी एक जबाबदारी दिली होती. ती म्हणजे नवोदित स्टार होऊ घातलेल्या राज कपूर यांचं आयुष्य योग्य मार्गावर आणण्याची. पृथ्वीराज कपूर निराश झाले होते. कारण- त्यांचा मुलगा तारुण्यात भरकटला होता; पण केदार शर्मा यांनी पुढाकार घेतला आणि मदत करण्याचं ठरवलं.
१९९९ मध्ये शशी रंजन यांनी त्यांच्या एक मुलाखत या मुलाखतीच्या मालिकेसाठी केदार शर्मा यांची निवड केलेली. या मालिकेत त्यांनी विस्मरणात गेलेल्या थोर व्यक्तींच्या जीवनावर प्रकाश टाकला आहे. १९४० आणि १९५० च्या दशकात अनेक दिग्गजांबरोबर काम केलेल्या केदार शर्मा यांच्यापेक्षा योग्य व्यक्ती या भागासाठी कोणी असू शकत नव्हती. त्या भागात त्यांना राज कपूर यांच्याबद्दल विचारण्यात आलं होतं. हा भाग आता यूट्यूबवरील ‘इंडियन टेलिव्हिजन अकॅडमी’ चॅनेलवर उपलब्ध आहे.
राज कपूर यांना होती वेश्या वस्त्यांमध्ये जाण्याची सवय
केदार शर्मा यांनी त्यावेळी सांगितलेलं, “पृथ्वीराज माझा खूप आदर करायचा. मला आठवतं की, एकदा तो खूप निराश झाला होता. इतका की, तो भावुक झालेला. मित्र म्हणून मी त्याला सांगितलं की, मला माहीत नाही काय समस्या आहे. पण, जर मी तुला मदत करू शकेन, असं वाटत असेल, तर मला नक्की सांग. तेव्हा त्यानं मला सांगितलं की, राज त्याच्या तारुण्यामुळे विचलित झाला आहे. अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी तो वेश्या वस्त्यांमध्ये जातो आणि स्त्रियांना भेटतो.” मी त्यांना सांगितलं की, याबद्दल आता काळजी करू नका. मी त्याला योग्य मार्गावर आणेन.”
केदार शर्मा यांनी तरुण राज कपूरला घडवण्याची जबाबदारी स्वीकारली याबद्दल त्यांनी सांगितलेलं, “राज माझ्याकडे असिस्टंट म्हणून कामाला आला. मी त्याला विचारायचो, तयार आहेस का? तर तो म्हणायचा की, होय मी तयार आहे. मग तो कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये पाहायचा आणि केस विंचरायचा . एका क्लॅपसाठी केस सेट करण्याची काय गरज होती त्याला? मी काही बोललो नाही; शेवटी तो अजून लहानच होता.”
“एक दिवस मी त्याला समजावलं की, कॅमेऱ्यात पाहून केस सेट करू नकोस; पण इतकं सांगूनही राजनं पुन्हा तेच केलं. मला खूप राग आला. मी त्याला पुन्हा बोलावलं आणि त्याच्या कानाखाली मारली. त्या रात्री मला झोपच लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तो मला भेटायला आला. तेव्हा मला समजलं की, त्याला अभिनेता व्हायचं आहे, आणि मी मात्र त्याला दिग्दर्शक बनवण्याचा प्रयत्न करत होतो. मी त्याला पाच हजार रुपये सायनिंग अमाउंट म्हणून दिले आणि ‘नील कमल’साठी २५ हजार रुपये दिले”, असं केदार शर्मा यांनी सांगितलेलं.
राज कपूर यांनी पुढे हिंदी चित्रपटसृष्टीत खूप नाव कमावलं, त्यांच्या भूमिका आणि चित्रपट आजही आवडीनं पाहिले जातात. हिंदी सिनेमाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचं श्रेयही त्यांना दिलं जातं. ते कपूर कुटुंबाचे कर्ता पुरुष मानले जातात.