Bollywood Actor reveals collapse of 200 million Doller business: बॉलीवूडमध्ये काम करणारे अनेक कलाकार हव्या तशा संधी मिळाल्या नाही तर करिअरचा वेगळा पर्याय निवडताना दिसतात. अभिनेता रजत बेदीनेदेखील जवळजवळ तीन दशकांपूर्वी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्याने अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले, पण, तरीही त्याला अपेक्षित यश मिळाले नाही.
बॉलीवूडमध्ये अपयशाला सामोरे जावे लागल्यानंतर रजत बेदीने एका नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी तो कॅनडाला गेला. रजत बेदीने सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत तो जे काम करत होता, त्यामध्ये समाधानी नसल्याचे वक्तव्य केले. तसेच, अभिनयातून ब्रेक घेण्याचा निर्णय कधी घेतला याबद्दलदेखील वक्तव्य केले.
“सर्व पैसे घेऊन…”
रजत बेदी म्हणाला, “त्या वेळी टेलिव्हिजन क्षेत्र भरभराटीला येत होते. त्याचदरम्यान मला एकता कपूरच्या कंपनीकडून ऑफर मिळाली. माझ्याकडे दोन पर्याय होते. एकतर एकताचा शो करायचा किंवा देश सोडून कॅनडाला जायचे. मी कॅनडाला जाण्याचा निर्णय का घेतला, तो किस्सादेखील मजेशीर आहे. माझा एक मित्र होता, ज्याने माझ्याकडून पैसे उधार घेतले होते.”
“माझ्याकडे असलेले सर्व भांडवल त्याच्याकडेच होते. तो व्याजासहित मला महिन्याला पैसे द्यायचा, त्यामुळे माझ्या घराचा खर्च भागत होता. अभिनयसृष्टी बेभरवशाची आहे, इथे काय होईल हे सांगता येत नाही. एक काळ असाही आला की मी दिवाळखोर झालो होतो. माझा मित्र माझे सर्व पैसे घेऊन कॅनडाला पळून गेला.”
रजत बेदी पुढे म्हणाला, “मी शूटिंग करत होतो, तेव्हा मला याबद्दल समजले. दुसरीकडे मला माझ्या करिअरमध्येदेखील प्रगती होत असल्याचे दिसत नव्हते. मी धडपडत होतो. माझं घर चालवण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. त्यानंतर माझ्या मित्राने मला कॅनडामधून फोन करायला सुरुवात केली. आपण कॅनडामध्ये एकत्र काम करू, असा त्याने माझ्यापुढे प्रस्ताव ठेवला.
“माझी मुलगी सहा महिन्यांची…”
“मी कॅनडामध्ये ‘इंटरनॅशनल खिलाडी’ आणि ‘द हिरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय’ अशा दोन चित्रपटांचे शूटिंग केले होते. मला कॅनडा आवडले होते, त्यामुळे मी माझ्या कुटुंबासह तिथे जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी माझी मुलगी सहा महिन्यांची होती आणि माझा मुलगा पाच वर्षांचा होता. मी २००७-०८ ला भारत सोडला. कॅनडामध्ये आम्ही रिअल इस्टेटचा बिझनेस सुरू केला. २००९-१० मध्ये घरे बांधण्यास सुरुवात केली. पहिले दोन प्रोजेक्ट होते, त्यातील काहीच विकले गेले नाही, आमचे खूप नुकसान झाले.”
“पुढे आम्हाला आमच्या व्यवसायात यश मिळाले, पण हा आनंद अल्पकाळ टिकला. आम्हा भागीदारांमध्ये समस्या निर्माण झाल्या. २०० मिलियन कॅनडियन डॉलर्सचा बिझनेस केल्यानंतर आम्ही आर्थिक संकटात सापडलो होतो, पण या सगळ्यावर मी मात केली. काही मित्रांच्या साहाय्याने पाच-सहा वर्षांचा काळ काढला. मी नवीन दोन भागीदार शोधले आणि रिअल इस्टेट व्यवसाय सुरू केला. २०१८ मध्ये माझ्या भागीदारांनी माझी इतकी फसवणूक केली की ते प्रकरण कायदेशीररित्या सोडवले गेले. या सगळ्यामुळे २०१८ ते २०२१ च्या दरम्यानच्या काळात मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास झाला.”
रजतने असेही स्पष्ट केले की, त्याने कधीही चित्रपटसृष्टी पूर्णपणे सोडली नाही. तो म्हणाला, “मी माझ्या दोन भागीदारांबरोबर कॅनडामध्ये चित्रपट बनवायला सुरुवात केली होती. आम्ही डालमोर एंटरटेनमेंट नावाची कंपनी उघडली. आम्ही ‘व्हाईट हिल प्रॉडक्शन्स’ला ‘पंजाब १९८४’, ‘सरदार जी २’, ‘चन्ना मेरेया’ यांसारख्या चित्रपटांना पाठिंबा दिला. आम्ही ‘झी’वर ‘हिटलर दीदी’ची निर्मिती केली. मी दक्षिणेत काही चित्रपट केले. मी चित्रपटसृष्टीशी कायमच जोडला गेलो होतो आणि बॉलीवूडमध्ये परतण्याची योग्य संधी शोधत होतो.”
दरम्यान, रजत बेदी नुकताच आर्यन खान दिग्दर्शित ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या वेब सीरिजमध्ये दिसला आहे.