‘गांधी गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट २६ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक राजकुमार संतोषी तब्बल ९ वर्षांनी पुनरागमन करत आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनचा कार्यक्रम व पत्रकार परिषद सुरू असताना काही जणांनी आंदोलन केलं होतं. तसेच काळे झेंडे दाखवत कार्यक्रम बंद पाडला होता. त्यानंतर आता दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी मुंबईचे विशेष सीपी देवेन भारती यांना पत्र लिहिलं आहे.
‘गांधी गोडसे – एक युद्ध’ या चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी मुंबईतील विशेष सीपी देवेन भारती यांना पत्र लिहून स्वत:साठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी अतिरिक्त सुरक्षेची मागणी केली आहे. मुंबईत त्यांच्या टीमने पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी आंदोलकांच्या एका गटाने त्यांची अडवणूक करत घोषणाबाजी केली होती. त्यानंतर आता राजकुमार संतोषी यांनी सुरक्षेची मागणी केली आहे.
‘गांधी गोडसे एक युद्ध’ चित्रपटाविरोधात आंदोलन; निर्मात्यांना काळे झेंडे दाखवत बंद पाडला कार्यक्रम
त्या प्रेस शोनंतर काही अज्ञात व्यक्तींनी धमक्या दिल्याचंही राजकुमार संतोषी यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रात नमूद केलंय. आपल्याला चित्रपटाचं प्रमोशन आणि प्रदर्शन रोखण्यासाठी धमक्या मिळत आहेत आणि यामुळे भीती वाटत आहे, त्यामुळे पोलिसांनी माझी व कुटुंबाची सुरक्षा वाढवावी, असं त्यांनी या पत्रात म्हटलंय.
नेमकं काय घडलं होतं?
शुक्रवारी (२० जानेवारी) निर्माते चित्रपटाचे प्रमोशन करत असताना त्यांना काही लोकांच्या विरोधाला सामोरं जावं लागलं होतं. लोकांनी चित्रपटाच्या प्रमोशन कार्यक्रमात निर्मात्यांना काळे झेंडे दाखवले आणि जोरदार घोषणाबाजी केली होती. विरोध वाढल्यानंतर पोलिसांना बोलवावं लागलं होतं. हा चित्रपट महात्मा गांधींना कमी लेखून त्यांचा मारेकरी नथुराम गोडसेचा गौरव करतो, असा आरोप आंदोलकांनी केला होता.