Rakhi Vijan Reveals Reason of Divorce of Rajeev Tandon:अभिनेत्री राखी विजाननने अनेक गाजलेल्या मालिकांत काम करत प्रेक्षकांचे मन जिंकले. ‘हम पाँच’, ‘देख भाई देख’, अशा मालिकेतून राखी विजानला मोठी लोकप्रियता मिळाली.

आता राखी विजान तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने नुकत्याच एका मुलाखतीत तिच्या घटस्फोटाबाबत वक्तव्य केले आहे. तसेच रवीना टंडनबाबतदेखील तिने केलेले वक्तव्य सध्या लक्ष वेधून घेत आहे.

राखी विजान काय म्हणाली?

अभिनेत्रीने नुकतीच ‘बॉलीवूड ठिकाणा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत रवीना टंडनचा भाऊ राजीव टंडनबरोबर लग्न का टिकले नाही, त्यांचा घटस्फोट का झाला, यावर तिने वक्तव्य केले. तसेच त्यांच्या घटस्फोटाला रवीना जबाबदार होती का, यावरदेखील तिने खुलासा केला. राखी विजान म्हणाली, “ज्या व्यक्तीबरोबर मी लग्न केले होते, तो खूप चांगला आहे. पण, आमचे नाते टिकू शकले नाही. आम्ही ते टिकवण्याचा प्रयत्न केला, पण आमचे नाते सुरळित झाले नाही, त्यामुळे आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला. पण, याचा संबंध रवीना टंडन, तिचे आई-वडील यांच्याशी अजिबात नाही. आमचं पटलं नाही म्हणून आमचा घटस्फोट झाला.”

“मी मीडियापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला, कारण ते माझ्या कुटुंबाबद्दल मला विचारण्याचा प्रयत्न करत होते. मला कोणताही वाद नको होता, त्यामुळे मी मीडियापासून दूर राहिले.”

रवीना टंडनबाबत अभिनेत्री म्हणाली, “मी आणि रवीना आम्ही बहि‍णींप्रमाणेच होतो. आम्ही कायमच एकमेकांशी चांगले वागायचो. रवीना आणि मी पार्टीला जायचो, भांडायचो, एकमेकांना समजवत असायचो, एकत्र मजा करायचो आणि एकमेकांवर खूप प्रेम करायचो”, असे म्हणत घटस्फोटासाठी रवीना किंवा तिचे घरचे जबाबदार नव्हते, हे अभिनेत्रीने स्पष्ट केले आहे.

राखी विजान ही गाजलेल्या मालिकांबरोबरच काही बॉलीवूड चित्रपटांमध्ये दिसली आहे. ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘मनी है तो हनी है’, ‘क्रिश ३’ या चित्रपटांत ती दिसली आहे. याबरोबरच, ती ‘बिग बॉस २’मध्ये दिसली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रवीना टंडन चित्रपटांबरोबर ओटीटीवरील वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. आता लवकरच ती ‘हाऊसफुल ५’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.