Ranbir Kapoor Didn’t Wanted To Work With Sonakshi Sinha : ‘दबंग’ चित्रपटाचा दिग्दर्शक अभिनव कश्यप काही दिवसांपासून चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे त्यानं सलमान खानबद्दल केलेलं विधान. ‘दबंग’ चित्रपटात त्यानं त्याच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितलेला. अशातच आता त्यानं अभिनेता रणबीर कपूरबद्दलही सांगितलं आहे.

‘दबंग’नंतर अभिनव कश्यपनं रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या ‘बेशरम’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. त्यामध्ये रणबीरबरोबर अभिनेत्री पल्लवी शारदा मुख्य भूमिकेत झळकलेली. परंतु, या चित्रपटासाठी पहिली पसंती सोनाक्षी सिन्हाला होती. ‘दबंग’ चित्रपटाच्या वेळी अभिनवनं सोनाक्षीबरोबर काम केलं होतं आणि ‘बेशरम’साठी त्याला पंजाबी भाषा बोलणारी मुलगी हवी होती म्हणून त्यानं तिची निवड केलेली. परंतु, रणबीरला सोनाक्षीबरोबर काम करायचं नव्हतं. जेव्हा रणबीर कपूरनं ‘बेशरम’ चित्रपट साइन केलेला तेव्हा माध्यमांच्या वृत्तानुसार तो कतरिना कैफबरोबर रिलेशनशिपमध्ये होता आणि त्यानं अभिनवला चित्रपटात तिची निवड करायला सांगितलेली.

‘बॉलीवूड ठिकाना’ला दिलेल्या मुलाखतीत रणबीरबद्दल अभिनव पुढे म्हणाला, “कतरिना कैफ या चित्रपटासाठी योग्य निवड नव्हती; पण त्यानं मला तिला या चित्रपटात काम करायचं आहे, असं सांगितलेलं. परंतु, मी त्याला म्हणालो, “ती यासाठी योग्य निवड नाही. कारण- मला दिल्लीतील पंजाबन हवी होती. कतरिनाला तिच्या भाषेवर काम करावं लागेल आणि मला ते लपवता येणार नाही. जर तुम्ही तिचे पूर्वीचे सगळे चित्रपट पाहिले, तर ती त्यातील प्रत्येकामध्ये एक तर एनआरआय दाखवली आहे किंवा मग फॉरेनर. कारण- तिला हिंदी बोलता यायचं नाही.”

अभिनवनं पुढे सांगितलं, “आम्ही तमन्ना भाटिया, स्वरा भास्कर, तापसी पन्नू, परिणीती चोप्रा यांसारख्या अभिनेत्रींची ऑडिशन घेतलेली. मला कतरिनाबरोबर काम करण्यात कुठली समस्या नव्हती. ती चांगली व्यक्ती आणि अभिनेत्री आहे. ‘वायकॉम’मधूनही सांगण्यात आलं की, कतरिनाला चित्रपटात काम करायचं आहे आणि मी त्यांनाही तेच सांगितलं, जे रणबीरला सांगितलेलं.”

रणबीर कपूरने दिलेला सोनाक्षी सिन्हाबरोबर काम करण्यास नकार

अभिनव पुढे म्हणाला, “आम्ही ठरवलं की, ऑडिशनमधून जी मुलगी त्या पात्रात सूट होईल तिची निवड करायची. पल्लवी शारदानं ऑडिशन दिली आणि सगळ्यांना ती आवडलेली. रणबीर कपूर, त्याचे आई-वडील, चित्रपटाचे निर्माते सगळ्यांना. पल्लवीनं ‘माय नेम इज खान’मध्ये सहायक भूमिका साकारलेली. त्यामुळे इंडस्ट्रीबाहेरून आलेल्या लोकांना मोठे प्रोजेक्ट मिळालेले. इंडस्ट्रीतील अनेकांना पटत नाही. खरं तर मी सुरुवातीला सोनाक्षीची निवड केलेली; पण रणबीरनं तिच्याबरोबर काम करायला नकार दिला. तो म्हणाला की, मला सोनाक्षीबरोबर काम करायचं नाहीये. आता त्यामागचं कारण त्यालाच माहीत.”