Ranbir Kapoor Gave 52 Retakes For A Scene In Tu Jhoothi Main Makkar : रणबीर कपूर बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. सध्या अभिनेता ‘लव्ह अँड वॉर’ या बहुचर्चित चित्रपटामुळे चर्चेत आहे. अशातच लोकप्रिय चित्रपट निर्माते व अभिनेता बोनी कपूर यांनी त्याच्याबरोबर काम करतानाचा एक किस्सा सांगितला आहे.
बोनी कपूर यांनी कोमल नाहतासह (Komal Nahta) संवाद साधताना याबद्दल सांगितलं आहे. ‘तू झूठी मैं मक्कार’ चित्रपटातील किस्सा सांगताना ते म्हणाले, “रणबीर कपूर असा अभिनेता आहे, ज्याला मी कधीच सेटवर चिडचिड करताना पाहिलं नाहीये. आम्ही सलग १६ तास शूटिंग केलेलं. दिल्लीमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांत शूटिंग करत असताना आम्ही दिवसा शूटिंग करण्यापेक्षा रात्रीचं शूटिंग करायचो. जेणेकरून वातावरण थोडं थंड असेल. त्यादरम्यान त्यानं एकदाही तक्रार केलेली नव्हती.”
रणबीर कपूरने ५२ रिटेक दिले – बोनी कपूर
बोनी कपूर पुढे चित्रपटातील सीनदरम्यानचा किस्सा सांगत म्हणाले, “मला आठवतं की, त्यानं एका सीनसाठी ५२ रिटेक दिले होते; पण तरीसुद्धा त्याची चिडचिड झाली नव्हती. सेटवर तो क्रूबरोबर खूप आदराने वागतो. मी जर १३-१४ रिटेकही दिले तरी कधी कधी चिडचिड होते. तो माझ्याकडे आला आणि म्हणाला की, जोवर दिग्दर्शकाचं समाधान होत नाही तोवर आपण रिटेक देत राहणं गरजेचं आहे. तो सेटवर खूप संयमानं वागतो.”
बोनी कपूर यांच्यापूर्वी ‘अॅनिमल’फेम अभिनेते सौरभ सचदेवा यांनीसुद्धा रणबीरचं कौतुक केलं होतं. भारती सिंह व हर्ष लिंबाचिया यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अभिनेत्याबद्दल सांगितलेलं, “त्याच्याबरोबर काम करताना खूप मजा आली. त्याला प्रत्येक गोष्टीबद्दल खूप कुतूहल असतं. त्याला तुमच्याबद्दल सगळं जाणून घ्यायचं असतं. त्यानं मला अनेक गोष्टींबद्दल विचारलं. कलाकाराला अशी उत्सुकरता असणं चांगली गोष्ट असते.”
दरम्यान, सध्या रणबीर संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. हा चित्रपट २६ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात लव्ह ट्रँगल पाहायला मिळणार असून, रणबीर कपूर, आलिया भट्ट व विकी कौशल पहिल्यांदाच एकत्र काम करीत आहेत. त्यामुळे आघाडीच्या या तिन्ही कलाकारांना एकत्र मोठ्या पडद्यावर पाहणं प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे.