Ranbir Kapoor on Daughter Raha: आज रणबीर कपूरचा ४३ वा वाढदिवस आहे. चाहत्यांसह मनोरंजनसृष्टीतून अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता चाहत्यांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी रणबीर कपूरने खास अंदाजात त्यांचे आभार मानले आहे. रणबीर कपूरचा लाइफस्टाइल ब्रँड आर्कच्या इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला.
रणबीर कपूरने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. तो म्हणतो, “मी तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो. माझ्या वाढदिवशी ज्या पद्धतीने तुम्ही माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आणि माझ्याप्रति प्रेम व्यक्त केले, त्यासाठी मी मनापासून आभारी आहे. आज मी ४३ वर्षांचा झालो. माझ्या दाढीमध्ये खूप पांढरे केस आहेत, हे तुम्ही पाहू शकता. ते दरवर्षी वाढत जातील.”
पुढे अभिनेता म्हणाला, “माझ्या हृदयात माझ्या कुटुंबाप्रति, माझ्या मित्रांप्रति, माझ्या कामाप्रति आणि सगळ्यात महत्वाचे तुम्ही, माझ्या चाहत्यांप्रति खूप कृतज्ञता आहे. तुम्ही माझ्यासाठी वेळ दिला, त्यासाठी मनापासून धन्यवाद. तुमच्यामुळे मी कोणीतरी खास आहे, असे मला वाटत आहे”, असे म्हणत रणबीरने त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या.
या व्हिडीओमध्ये रणबीर बोलत असताना त्याच्या पाठीमागे त्याची मुलगी राहाचा गोड आवाज ऐकायला मिळत आहे. एका वेळी ती कर्कश आवाजात ओरडत असल्याचेदेखील ऐकायला मिळत आहे.
तसेच इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये रणबीर कपूरने हेदेखील उघड केले की राहाने त्याला त्याच्या वाढदिवशी काय गिफ्ट दिले. रणबीर कपूर म्हणाला, “मी संपूर्ण दिवस आलिया आणि राहाबरोबर घालवला आहे. राहाने मला वचन दिले होते की ती मला माझ्या वाढदिवशी ४३ किसेस देईल. तर मला ते मिळाले आहे. तिने माझ्यासाठी कार्डदेखील बनवले आहे.”
रणबीर कपूर आणि आलिया भट्टची लेक राहा कायमच चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. जी जेव्हा जेव्हा चाहत्यांच्या समोर येते, तेव्हा तेव्हा चाहत्यांना तिच्या प्रेमात पाडते.
आता रणबीर वाढदिवसानिमित्ताने त्याची आई नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर रणबीर आणि आलियाचा फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
रणबीर कपूरच्या कामाबद्दल बोलायचे तर तो लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात आलिया आणि विकी कौशलदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. याबरोबरच, तो ‘रामायण’ या चित्रपटात देखील प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटात, रवी दुबे, सनी देओल, साई पल्लवी हे लोकप्रिय कलाकारदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.