रणबीर कपूर आणि आलिया भट बॉलीवूडमधील गोड जोडप्यांपैकी एक मानले जाते. गेल्या वर्षी १४ एप्रिल २०२२ रोजी या दोघांनी लग्न करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. आज रणबीर आणि आलियाच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. मात्र, लग्नाच्या पहिल्याच वाढदिवशी रणबीरने आपल्या लग्नाबद्दल केलेले वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे. रणबीरच्या मते, ‘तो आलियासाठी चांगला नवरा नाहीये.’ रणबीरच्या या वक्तव्यानंतर अनेकांचा भुवया उंचवल्या आहेत.
हेही वाचा- “मला ‘जान’ म्हणण्याचा अधिकार…”; सलमान खानचे वक्तव्य चर्चेत, म्हणाला, “तिला आय लव्ह यू…”
‘फ्री प्रेस जर्नल’ला दिलेल्या मुलाखतीत रणबीरने अलीकडेच आलियासोबतच्या त्याच्या लग्नाविषयी वक्तव्य केले आहे. तसेच तो स्वतःला कसा नवरा मानतो याबाबतही खुलासा केला आहे. रणबीर म्हणाला, “आपण चांगलं करत आहोत असं आपल्याला वाटतं, मात्र आयुष्य कधीच परिपूर्ण नसतं. मला वाटत नाही की, मी एक चांगला मुलगा, चांगला भाऊ आणि चांगला नवरा आहे. पण मला चांगलं बनण्याची इच्छा आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला याची जाणीव आहे तोपर्यंत तुम्ही योग्य मार्गावर आहात.”
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी काही वर्षे त्यांचे नाते अगदी खासगी ठेवले होते. मात्र, लग्नाआधी ते अनेकदा कौटुंबिक कार्यक्रम आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले. या जोडीने १४ एप्रिल २०२२ रोजी त्यांच्या मुंबईतील घरात विवाह केला होता. चित्रपट निर्माता करण जोहरसारखे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य त्यांच्या लग्नाला उपस्थित होते. लग्नाच्या काही महिन्यांनंतर, आलियाने ६ नोव्हेंबर २०२२ रोजी इन्स्टाग्राम पोस्ट करत आपल्या गरोदरपणाची माहिती दिली होती.
हेही वाचा- सलमान खानला विराट कोहलीच्या फिटनेसची भुरळ, पण आवडता क्रिकेटपटू दुसराच; नाव सांगत म्हणाला…
रणबीरच्या वर्क फ्रंटबाबत बोलायचं झालं तर, रणबीर शेवटचा ‘तू झुठी मैं मक्कार’ चित्रपटात श्रद्धा कपूरसोबत दिसला होता. या चित्रपटात अनुभव सिंग बस्सी, डिंपल कपाडिया आणि बोनी कपूर हेदेखील साहाय्यक भूमिकांत होते. रणबीरच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये रश्मिका मंदान्नासोबत ‘अॅनिमल’चा समावेश आहे. तर आलिया भट्ट लवकरच रणवीर सिंगसोबत ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’मध्ये दिसणार आहे. आलियाकडे गॅल गॅडोट आणि जेमी डोर्ननसोबत ‘हार्ट ऑफ स्टोन’सारखे प्रोजेक्टही आहेत. नेटफ्लिक्स स्पाय चित्रपटाद्वारे आलिया हॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.