Rashmika Mandana Talk About Working Hours : रश्मिका मंदाना सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. रश्मिका सध्या ‘थामा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. तर दसुरीकडे तिच्या व विजय देवरकोंडाच्या लग्नाच्या चर्चाही सोशल मीडियावर सुरू असल्याचं दिसतं. अशातच तिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्रीला खासगी आयुष्यात कुटुंबीयांसाठी फार वेळ मिळत नसून, ती अति प्रमाणात काम करतेय, असं तिनं म्हटलं आहे.
रश्मिका मंदाना व अभिनेता विजय देवरकोंडा सध्या त्यांच्या साखरपुड्याच्या बातमीमुळे चर्चेत आहेत. त्यांनी याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती दिली नसली तरी त्यांच्या चाहत्यांमध्ये याबद्दल चर्चा सुरू असल्याचं दिसतं. अशातच आता रश्मिकाने यादरम्यानच तिच्या खासगी आयुष्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
रश्मिका मंदानाची प्रतिक्रिया
रश्मिकाने Gulteशी संवाद साधताना ती अति प्रमाणात काम करीत असून तिला आठ तासांची झोपही मिळत नाही आणि तिलाही सर्व सामान्यांप्रमाणे ९-६ अशा वेळापत्रकाप्रमाणे काम करायचं आहे, असं म्हटलं आहे. रश्मिका याबद्दल म्हणाली, “मी खूप काम करतेय आणि मी तुम्हाला हेच सांगेन की, हे अजिबात योग्य नाहीये. असं करू नका. तेच करा, जे करताना तुम्हाला त्रास होत नाही. आठ तासांची झोप पूर्ण करा. विश्वास ठेवा की, त्यामुळे तुम्हाला पुढे खूप आराम मिळेल. मी अलीकडेच काम करण्याच्या तासांबद्दल अनेक प्रतिक्रिया ऐकल्या आहेत. पण, इतकं काम करण्यात अर्थ नाही.”
कौटुंबिक आयुष्यावर लक्ष द्यायचंय – रश्मिका मंदाना
रश्मिका याबद्दल पुढे, कलाकारांचेही कामाचे तास ठरलेले असते, तर त्यांनीसुद्धा व्यावसायिक आणि खासगी आयुष्यात समतोल साधला असता,असं म्हटलं आहे. त्याबद्दल ती म्हणाली, “जर मला असं करण्याची मुभा असती, तर मी जसे ऑफिसात ९ ते ५ अशा वेळेतच काम केलं जातं, तसं आम्हालाही द्या, असं म्हटलं असतं. कारण – मलाही कौटुंबिक आयुष्यावर लक्ष द्यायचंय. मलासुद्धा पूर्ण झोप हवी आहे.”
रश्मिका पुढे याबद्दल म्हणाली, “मलाही व्यायाम करायचा आहे. जेणेकरून मला पुढे त्रास होणार नाही. मी माझ्या भविष्याबद्दल विचार करीत असते; पण, मला याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. कारण- मीच अधिक प्रमाणात कामाचा स्वीकार करीत आहे.”
