Rashmika Mandanna Talks About Her Personal Life : रश्मिका मंदाना सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. गेली आठ वर्षे ती तेलूगु इंडस्ट्रीत कार्यरत असून, आता बाॉलीवूडमध्येही तिने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलीये. रश्मिकाच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळतं. तर ती सध्या एकामागोमाग हिट चित्रपट देणारी अभिनेत्री म्हणूनही ओळखली जात आहे. तिचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. परंतु, इतकं सगळं असूनही अभिनेत्रीला एका गोष्टीची मात्र खंत असल्याचं तिनं मुलाखतीतून सांगितलं आहे.
रश्मिका मंदानानं आजवर अनेक दिग्गज मंडळींसह काम केलं आहे. नुकतीच ती दाक्षिणात्य अभिनेता धनुष व नागार्जुन यांच्या ‘कुबेरा’ या चित्रपटातून झळकली होती. आता सध्या ती तिच्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. त्यामुळे व्यावसायिक आयुष्यातील कामाच्या व्यापामुळे अभिनेत्रीला तिच्या कुटुंबीयांना, मित्र-मैत्रिणींना वेळ देता येत नाही.
रश्मिका ‘नड मग’शी (Nod Mag) संवाद साधताना याबाबत म्हणाली, “मी सुट्टी मिळावी यासाठी अक्षरश: रडते. मला एक बहीण आहे, जी माझ्यापेक्षा १६ वर्षांनी लहान आहे. ती आता १३ वर्षांची आहे आणि आठ वर्षांपूर्वी जेव्हा मी काम करायला सुरुवात केली होती तेव्हापासून मी तिला मोठी होताना पाहिलेलंच नाहीये. ती आता जवळपास माझ्याएवढी दिसते”. रश्मिका पुढे म्हणाली, “गेलं एक-दीड वर्ष मी माझ्या घरीसुद्धा गेलेली नाहीये. मला माझ्या मित्रांनाही भेटता येत नाही. पूर्वी ते निदान मला त्यांच्या प्लॅनमध्ये सामील तरी करायचे. आता तर ते मला त्यांच्यामध्ये मोजतपण नाहीत आणि हे कटू सत्य आहे.”
रश्मिकाला याबाबत तिच्या आईनं एक सल्ला दिल्याचं तिनं सांगितलं आहे. आईबद्दल अभिनेत्री म्हणाली, “माझी आई नेहमी म्हणते, जर तुम्हाला तुमच्या व्यावसायिक आयुष्यामध्ये यशाचं शिखर गाठायचं असेल, तर तुम्हाला तुमच्या खासगी आयुष्याचा त्याग करावा लागेल आणि जर खासगी आयुष्य हवं असेल, तर व्यावसायिक आयुष्याशी तडजोड करावी लागेल. पण मला असं वाटतं की, मी अशी व्यक्ती आहे की, मी याहीपेक्षा दुप्पट मेहनत करेन; पण मला व्यावसायिक आणि खासगी दोन्ही गोष्टी हव्या आहेत. तो खरं तर वेगळाच संघर्ष आहे”.
रश्मिका मंदानाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तिचा ‘कुबेरा’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर ती बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुरानाची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटातून झळकणार आहे. तर ‘कुबेरा’ चित्रपटाआधी ती ‘पुष्पा २’, ‘छावा’, ‘सिकंदर’ यांसारख्या चित्रपटांतून महत्त्वपूर्ण भूमिकांत झळकली आहे. ‘पुष्पा २’ व ‘छावा’ या तिच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले.