९० च्या दशकात चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री रविना टंडन आजही चांगलीच चर्चेत असते. ९० च्या दशकातील काही ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये रविनाचं नाव घेतलं जायचं. आताही काही चित्रपट आणि वेबसीरिजमधून रविनाने उत्तम काम करत स्वतःला पुन्हा सिद्ध केलं आहे. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान तिने ९० च्या दशकातील चित्रपटसृष्टीतील काही गोष्टींवर टीका केली आहे.
तेव्हा बऱ्याच चित्रपटात बोल्ड सीन्स, किसिंग सीन्स तसेच आयटम नंबर्सचा भडिमार असायचा. तरी या सगळ्यांमध्ये राहून रविनाने स्वतःचं वेगळंपण कसं सिद्ध केलं यावर भाष्य केलं आहे. रविनाने चित्रपटात स्विमिंग कॉस्च्युम घालायला नकार दिला, इतकंच नव्हे तर तिने एकही किसिंग सीन दिलेला नाही, शिवाय रेप सीनचं चित्रीकरण करतानासुद्धा रविनाने एक विशेष अट घातली होती, यावर रविनाने एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे.
आणखी वाचा : Kantara 2 Update : ‘कांतारा २’च्या कथानकाबद्दल रिषभ शेट्टीचा मोठा खुलासा; केव्हा होणार पुढील भाग प्रदर्शित?
एएनआयशी संवाद साधताना रविना म्हणाली, “मला तेव्हा बऱ्याच गोष्टी पटायच्या नाहीत, जर एखादी डान्स स्टेप मला खटकली तर मी त्याबद्दल लगेच बोलून दाखवायचे आणि डान्स स्टेप बदलून घ्यायचे. शिवाय मी स्विमिंग कॉस्च्युम परिधान करण्यास तसेच किसिंग सीन करण्यास नकार दिला होता. मी एकमेव अशी अभिनेत्री आहे जीने रेप सीन दिला पण त्यात माझे कपडे फाटलेले तुम्हाला दिसणार नाही. मी तशी अटच घालायचे, यामुळे मला प्रचंड घमेंड आहे असं बऱ्याच लोकांना वाटायचं.”
इतकंच नाही तर तिच्या या स्वभावामुळे तिच्या हातून बरेच चांगले चित्रपट निसटले यावरही तिने भाष्य केलं आहे. ती म्हणाली, “डर या चित्रपटासाठी सर्वप्रथम मला विचारण्यात आलं होतं. अर्थात तो काही वल्गर चित्रपत नव्हता पण त्यातील काही सीन्स करण्यात मला अडचण होती. इतकंच नाही तर करिश्मा कपूरचा पहिला चित्रपट ‘प्रेम कैदी’साठीदेखील मला विचारणा झाली होती. त्यातीलही बरेच सीन्स मला न पटणारे होते त्यामुळे मी ते चित्रपत केले नाहीत.”
आणखी वाचा : ‘वाळवी २’ येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांची मोठी घोषणा
बॉलिवूडमध्ये होणाऱ्या बॉडी शेमिंगबद्दलही रविनाने खुलासा केला आहे. चित्रपटसृष्टीत तेव्हा पुरुषांचं एवढं वर्चस्व होतं की त्यांचा शब्द हा प्रमाण मानला जायचा असं रविनाने सांगितलं. शिवाय ९० च्या दशकातील पत्रकारितेच्या क्षेत्रातील काही खटकणाऱ्या गोष्टींमुळे चित्रपटातून ब्रेक घेतल्याचंही रविनाने स्पष्ट केलं. रविनाने ‘केजीएफ २’सारख्या चित्रपटातून पुन्हा कमबॅक केलं, शिवाय तिची नेटफ्लिक्सवरची ‘अरण्यक’ ही वेबसीरिजही चांगलीच गाजली.