Rekha Ands Jaya Bachchan in Silsila: बॉलीवूडमधील अनेक प्रेमकहाण्या अशा आहेत, ज्यांची चर्चा वर्षानुवर्षे होते. यामध्ये ऐश्वर्या राय व सलमान खान, संजीव कपूर व हेमा मालिनी यांच्याबरोबरच अमिताभ बच्चन व रेखा यांच्या नात्याची आजही चर्चा होताना दिसते.
अमिताभ बच्चन व रेखा यांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केले आहे. दोघेही बॉलीवूडमधील दिग्गज कलाकार आहेत. अमिताभ बच्चन आजही विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. तर रेखादेखील अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावत सर्वांची मने जिंकतात. अमिताभ बच्चन, जया बच्चन व रेखा या त्रिकुटाबद्दल अनेकदा चर्चा होताना दिसते.
रेखा व जया बच्चन यांचा ‘सिलसिला’मधील सीन होतोय व्हायरल
आता हे त्रिकुट पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. याचे कारण म्हणजे ‘सिलसिला’ चित्रपटातील एक सीन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. १९८१ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अभिनेत्री जया बच्चन, रेखा आणि अमिताभ प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटात या तीन कलाकारांच्या खऱ्या आयुष्याचे प्रतिबिंब दिसते. जया बच्चन यांनी सिलसिलामध्ये शोभा मल्होत्रा तर रेखा यांनी चंदिनी आनंद हे पात्र साकारले आहे. याबरोबरच, अमिताभ बच्चन यांनी अमित हे पात्र साकारले आहे.
शोभा व अमित यांचे लग्न झाले आहे. तर चंदिनी अमितच्या प्रेमात आहे. एकाच व्यक्तीवर प्रेम असलेल्या दोन महिलांमधील हा संवाद आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या सीनमध्ये शोभा चंदिनीला म्हणते की तुम्ही त्यांना सोडून द्या. त्यावर चंदिनी म्हणते की ते माझ्या हातात नाही आणि जे माझ्या हातात नाही, ते मी कसं करू शकते?
शोभा पुन्हा चंदिनीला म्हणते की अमित माझे पती आहेत. ते माझा धर्म आहेत. त्यावर चंदिनी म्हणते की ते माझे प्रेम आहेत आणि माझे प्रेम माझे नशीब बनले आहे.
या सगळ्यात अमित प्रामाणिक बायको आणि एक्स गर्लफ्रेंड चंदिनी यांमध्ये अडकलेला दिसतो. चित्रपटाचे कथानक पाहता, यश चोप्रा यांनी या कलाकारांच्या खऱ्या आयुष्यापासून प्रेरणा घेत हा चित्रपट बनवल्याचे म्हटले होते. या चित्रपटाचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे आता या चित्रपटातील व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओ क्लीपला चाहते भरभरून प्रतिसाद देताना दिसत आहेत.
दरम्यान, अमिताभ बच्चन त्यांच्या ब्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतात. त्यांच्या पोस्टची मोठी चर्चा होताना दिसते.