Renuka Shahane on Daily Soaps : प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. चित्रपटांसह त्यांनी छोट्या पडद्यारील ‘सुरभी’, ‘आवाज महाराष्ट्राचा’ या कार्यक्रमात काम केलं आहे. अशातच आता नुकतंच त्यांनी मालिकांबद्दल त्यांचं स्पष्ट मत मांडलं आहे. त्यांनी सध्या सुरू असलेल्या मालिकांमध्ये तेच तेच दाखवलं जात असल्याचं म्हटलं आहे.
रेणुका शहाणे यांनी ‘आयएएनएस’शी (IANS) संवाद साधला आहे. यामध्ये त्यांनी मालिकांविषयीचं त्यांचं मत मांडलं आहे. त्या म्हणाल्या, “मला मालिकांसाठी विचारणा झाली आहे, पण मालिकांमध्ये काम करायचं असेल तर पूर्ण दिवस द्यावा लागतो, त्यामुळे मालिका करत असताना मला लिखाण, दिग्दर्शन आणि माझं घर या सगळ्याकडे लक्ष देता येणार नाही आणि दुर्दैवाने छोट्या पडद्यावरील बहुतांश मालिकांमध्ये तेच तेच दाखवलं जातं आणि फार जुनाट विषय पाहायला मिळतात.”
रेणुका शहाणे पुढे मालिकांबद्दल म्हणाल्या, “मालिकांमध्ये महिलांना कायम एकमेकांबद्दल वाईट बोलताना किंवा त्याच त्याच भूमिकांमध्ये दाखवलं जातं. मला एकदा सासूच्या भूमिकेसाठी विचारलं होतं, पण मी नकार दिला. मला असं वाटतं, सासू किंवा सुनेचे खूप वेगले पैलू दाखवता येऊ शकतात. आज स्त्रिया खूप काही करत आहेत, पण त्यातलं काहीच मालिकांमध्ये मला पाहायला मिळत नाही, जी खूप वाईट गोष्ट आहे. एकेकाळी टेलिव्हिजन हे समाजामध्ये बदल व्हावा आणि चांगल्या गोष्टी घडाव्या यासाठी महत्त्वाचं मानलं जायचं. पण आता असं काहीच मालिकांमध्ये पाहायला मिळत नाही.”
दरम्यान, रेणुका शहाणे यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर नुकत्याच त्या ‘देवमाणूस’ या चित्रपटात झळकल्या होत्या. यामध्ये त्यांच्यासह महेश मांजरेकर, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके हे कलाकार झळकले होते. तेजस देओस्कर दिग्दर्शित ‘देवमाणूस’ हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित झाला होता.