Renuka Shahane : बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने काही दिवसांपुर्वी ‘स्पिरीट’ चित्रपटातून एक्झिट घेतल्याची घोषणा केली. दीपिकाने दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्याबरोबर आठ तासांच्या शिफ्टमध्ये काम करण्याची अट घातली होती. ज्यावर एकमत न झाल्याने अभिनेत्रीने हा चित्रपट सोडला. दीपिकाच्या ‘स्पिरीट’मधील एक्झिटनंतर कामाचे तास आणि काम करण्याच्या पद्धतीबद्दलच्या अनेक चर्चा होताना दिसत आहेत. यावर अनेक कलाकार मंडळी त्यांची मतं व्यक्त करत आहेत.
अशातच आता अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी कलाकारांच्या आठ तासांच्या कामाच्या शिफ्टबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘आठ तासांच्या कामाची शिफ्ट असणे हा पूर्णपणे वैयक्तिक निर्णय असावा. त्यासाठी कोणताही नियम बनवू नये’ असे रेणुका शहाणे यांचे मत आहे. तसंच त्यांनी सांगितले की, कामाचे तास हे एखाद्याच्या गरजेवर आणि निवडीवर अवलंबून असतात. कोणत्याही सामाजिक दबावावर नाही.
न्यूज 18 नुसार, हिंदुस्तान टाईम्सला रेणुका शहाणेंनी सांगितलं, “या विषयावर मी कोणतेही एकतर्फी विधान करू इच्छित नाही; कारण अनेक पुरुष कलाकारदेखील आहेत; जे महिला कलाकारांबरोबरच कामाचे तास कमी करू इच्छितात. केवळ महिला कलाकारच नाही तर अनेक कलाकारांना त्यांच्या कुटुंबियांबरोबर वेळ घालवायचा असतो. त्यामुळे ही फक्त महिलांची मागणी आहे, असे म्हणणे चुकीचे ठरेल. हा वैयक्तिक निर्णय आहे.”
दीपिका पादुकोण इन्स्टाग्राम पोस्ट
यापुढे रेणुका शहाणे म्हणाल्या, “अशा अनेक महिला माहित आहेत; ज्या १८ तासांच्या शिफ्टमध्ये आपल्या मुलांना सेटवर घेऊन येतात आणि तिथे त्यांची काळजी घेतात. त्यामुळे ही वैयक्तिक निवड आहे. यासाठी कोणतीही सक्ती नसावी. कलाकार आणि निर्मात्यामध्ये आदराची भावना असली पाहिजे. कारण, जर एकमेकांविषयी आदर नसेल, तर तुम्ही काम करू शकणार नाही.”
दरम्यान, दीपिकाने दिवसाला फक्त आठ तास काम करण्यासह काही अटी ठेवल्या होत्या, ज्या दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाने मान्य करण्यास नकार दिला. त्यानंतर दीपिकाने ‘स्पिरीट’ चित्रपट सोडला. या निर्णयानंतर सोशल मीडियावर वाद सुरू झाला आहे. सोशल मीडियावरील काही जण दीपिकाचे कौतुक करत तिच्या मागण्या रास्त असल्याचं मत व्यक्त करत आहेत; तर काही जण तिच्या मागण्या ‘अवास्तव’ असल्याचं म्हणत आहेत.