Renuka Shahane Talks About In Laws : रेणुका शहाणे नेहमीच विविध विषयांवरील त्यांचे विचार, मतं स्पष्टपणे मांडत असताता. अलीकडेच त्यांनी त्यांचे पती आशुतोष राणा यांच्याबद्दलही प्रतिक्रिया दिलेली. अशातच यासह त्यांनी स्त्रिया डोक्यावर पदर घेतात याबद्दलही त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
रेणुका शहाणे यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या लग्नानंतरच्या आठवणी सांगितल्या. यावेळी त्यांनी स्त्रियांनी डोक्यावर पदर घेण्याबद्दलही सांगितलं आहे. ‘अमुक तमुक’ला दिलेल्या मुलाखतीत त्या याबद्दल म्हणाल्या, “मला डोक्यावर पदर घेणं हा प्रकार खरंच अजिबात आवडत नाही. ती खूप जुनाट गोष्ट आहे. असं नाहीये की, ते छान दिसत नाही. ते दिसतं खूप छान. पण, त्या गोष्टींची अपेक्षा फक्त स्त्रियांकडून ठेवली जाते. मला असं वाटतं की, त्याच्यावरून कोणाचेही संस्कार दिसत नाहीत.
डोक्यावर पदर घेणाऱ्या स्त्रीयांबद्दल रेणुका शहाणे यांची प्रतिक्रिया
रेणुका पुढे म्हणाल्या, “मी अशाही बायका पाहिलेल्या आहेत, ज्या डोक्यावर पदर घेतात, सगळं करतात म्हणजे देवघर स्वच्छ ठेवतात, देवाची पूजा करतील; पण घाणेरड्या स्वभावाच्या असतात त्या. मात्र, फक्त डोक्यावर पदर घेतात म्हणून काही दिसत नाही आणि अशाही मुली असतात, ज्या मॉर्डन कपडे परिधान करतात; पण त्यांच्या सासू-सासऱ्यांसाठी खूप करतात. तुम्हाला काय महत्त्वाचं आहे- स्वभाव की वेश? त्यामुळे मी त्याच्या विरोधात आहे. नाही तर ‘हम आपके हैं कौन’मध्ये केलं तसंच मी माझ्या गावी जाते तेव्हा करते. कारण- चित्रपटात १५० दिवसांसाठी केलंच ना? मग इथे मी माझ्या नवऱ्यासाठी करते.”
“माझा नवरा मला याबद्दल म्हणतो की, तू केलं पाहिजेस असं सगळं आणि मी मानते त्यांना. पण, बऱ्याच माझ्या मैत्रिणी म्हणतात की, काय वेडेपणा आहे हा. तू नाहीयेस ही. मी म्हटलं की ठिके. मला आवडतं की, माझ्या कुटुंबीयांना माझ्याबद्दल चांगलं वाटलं पाहिजे. त्यांच्याबरोबर मी जेव्हा असते तेव्हा मी त्यांच्यासारखीच असते.
सासरच्या मंडळींबद्दल रेणुका म्हणाल्या, “मला आवडतं माझ्या कुटुंबाबरोबर राहायला, जर मी वेगळी होऊन राहिले, तर कदाचित त्यांनी त्या प्रेमाने आणि आपुलकीने माझा स्वीकार केला नसता. तर ते महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. म्हणून मी करते. पण एक विचारधारा म्हणून पाहिलं, तर ते म्हणणं की, एका स्त्रीनं डोक्यावर पदर घेतला, तरंच ती संस्कारी आहे, तर तसं नाहीये. संस्कार फक्त कपड्यांवरून दिसत नाहीत, असं मला वाटतं.”