Renuka Shahane Talks About Husband Ashutosh Rana : अभिनेत्री रेणुका शहाणे व अभिनेते आशुतोष राणा हे बॉलीवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहे. रेणुका अनेकदा मुलाखतीत त्यांचे पती आशुतोष यांच्याबद्दल बोलत असतात. अशातच त्यांनी त्यांच्या लग्नाबद्दल माहिती दिली आहे.
रेणुका शहाणे यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या खासगी आयुष्याबद्दलची माहिती दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या आई-वडिलांच्या घटस्फोटाबद्दल, तसेच आशुतोष यांच्याबरोबर लग्न झाल्यानंतरच्या दिवसांबद्दलही सांगितलं. त्यादरम्यान त्यांनी आशुतोष यांच्याबरोबर लग्न करताना भीती वाटली असल्याचं सांगितलं.
आम्हाला एकमेकांशी लग्न करायचं नव्हतं – रेणुका शहाणे
‘अमुक -तमुक’ला दिलेल्या मुलाखतीत रेणुका आशुतोष यांच्याबरोबरच्या लग्नाबद्दल म्हणाल्या,”खरं म्हणजे आम्हाला दोघांना एकमेकांशी लग्न करायचं नव्हतं. आम्ही डेट करीत होतो. आम्ही खूप चांगले मित्र झाले होतो. रिलेशनशिपमध्ये तर होतो; पण लग्नाबद्दल नाही म्हटलं तरी भीती वाटत होती. त्या काळातसुद्धा आणि आम्ही ज्या क्षेत्रात आहोत तिथे सगळ्याच लोकांचं काहीतरी म्हणणं असतं. राणाजी आणि माझ्यामध्ये तर इतकं अंतर आहे.”
मी नास्तिक आहे – रेणुका शहाणे
आशुतोष राणा यांच्याबद्दल रेणुका पुढे म्हणाल्या, “ते अत्यंत आस्तिक आहेत आणि मी नास्तिक आहे. मी स्वत:ला नास्तिक का म्हणते. कारण- आमच्या घरात देवघरच नव्हतं. आमच्या घरात ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती होती. वारकरी संप्रदायाचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. त्यामुळे असे जे आदर्श आहेत, त्यांच्याबद्दल मला खूप आदर्श वाटतो; पण नाही म्हटलं तरी देवघरात देव नाही. त्यामुळे राणाजींना त्याबद्दलही एक भीती होती.”
रेणुका पुढे पतीबद्दल म्हणाल्या, “कारण – त्यांच पूर्ण कुटुंब खूप धार्मिक आणि आस्तिक आहे. त्यांचे आध्यात्मिक गुरुजी होते देवप्रभाकर शास्त्री. तर आम्ही जेव्हा डेट करीत होतो तेव्हा ते गुरू आशुतोष यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक होते. तसेच ते माझ्या आयुष्याचेही झाले. आम्ही त्यांना दादाजी म्हणायचो. एकदा त्यांनी राणाजींना सांगितलं की, मी तुझ्यासाठी मुलगी निवडली आहे आणि ती रेणुका आहे. तेव्हा राणाजींनी त्यांना पहिला प्रश्न विचारला की, ती तर नास्तिक आहे दादाजी. तर मी आस्तिक असून, आमचं कसं लग्न होईल.”
रेणुका याबद्दल पुढे म्हणाल्या, “त्यावर ते म्हणाले, की तू का स्वत:ला आस्तिक मानतोस आणि तिला नास्तिक. तुझे जर १० कार्यक्रम असतील, तर ती किती कार्यक्रमांना जात असेल? तर ते म्हणाले, तिला जमलं, तर १० नाही तर आठ तरी नक्की. त्यानंतर त्यांनी विचारलं की, तू तिच्या किती कार्यक्रमांना जातोस. यावर आशुतोष म्हणाले चार वगैरे. त्यावर दादाजी म्हणाले की, मग खरी आस्तिक कोण आहे. त्यामुळे मी सांगतोय की, लग्न कर तिच्याबरोबर.”