Renuka Shahane Talks About Husband Ashutosh Rana : रेणुका शहाणे व आशुतोष राणा हे बॉलीवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटी कपलपैकी एक आहेत. दोघांना दोन मुलं आहेत. रेणुका शहाणे अनेकदा त्यांच्या पतीबद्दल, मुलांबद्दल मुलाखतीतून बोलताना दिसतात. अशातच आता त्यांनी आशुतोष यांच्याबद्दल सांगितलं आहे.
रेणुका शहाणे यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या बालपणीच्या आठवणींबद्दल, त्यांच्या लग्नाबद्दल, संसाराबद्दल सांगितलं आहे. ‘अमुक तमुक’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आशुतोष यांच्याबरोबर लग्न झाल्यानंतर सासरी मिसळायला त्यांना थोडं कठीण गेल्याचं सांगितलं आहे.
“मला माझ्या घरी लोक आलेलं आवडत नाही” – रेणुका शहाणे
रेणुका शहाणे मुलाखतीत याबद्दल म्हणाल्या, “मला माझ्या घरी लोक आलेले आवडत नाही. माझं लग्न झाल्यानंतर मला धक्का बसला की, एकही दिवस फक्त आम्ही दोघे घरी नव्हतो. सतत कोणीतरी असायचं. त्यांचं जगणंच तसं असतं. माझ्या नणंदापण आहेत, मोठे दीरही आहेत त्यांच्या घरात सतत कोणीतरी असतंच. कधीही कोणीही यावं, भरपूर जेवावं आणि जावं. पण, मी अजिबात तशी नाहीये. तेव्हा लग्नानंतर ५-६ वर्षं सकाळ ते संध्याकाळ लोक येतायत त्यांना खायला घाला, त्यांचा पाहुणचार करा. त्यात मुलं लहान हेच सगळं सुरू होतं. या दोन्ही गोष्टी एकत्र सांभाळणं आव्हानात्मक होतं.
रेणुका सासरच्या मंडळींबद्दल पुढे म्हणाल्या, “मोठं कुटुंब असल्यानं ते कधी कधी मुंबईला येऊन राहायचे तेव्हा मग त्यांच्या सेवेत असणं. मला वाटलं की हे असं नाही जगू शकत. ताकद नव्हती. मग मी एकदा राणाजींना सांगितलं की, सॉरी पण तुम्ही बाहेर जाऊन सगळ्यांना भेटू शकता, काही करू शकता. पण हे माझं एकच घर आहे आणि मी असं नाही जगू शकत. तर हे आपण कमी कमी करूयात. त्यावर ते म्हणाले, की आधी का नाही सांगितलंस.”
रेणुका पुढे याबद्दल म्हणाल्या, “अनेकदा आपल्याला अपेक्षित असतं की, तुम्हाला दिसलं नाही का? तुम्ही ओळखलं नाही का तर नसेल ओळखलं त्यांनी. त्यानं काही बदलत नाही; पण तुमच्यासाठी ते महत्त्वाचं आहे ना मग तुम्ही सांगा ना. नाही होत तसं. मी त्यांना चिडवते पण की, कोणीतरी तुम्हाला तुमच्या गावाकडची मिळाली असती तर तिनं काय सेवा केली असती तुमची दिवस-रात्र. ते म्हणाले, नाही; पण मी दुसऱ्या कुठल्याही स्त्रीबरोबर जगू शकलो नसतो.”