Renuka Shahane Talks About Childhood Memories : लोकप्रिय अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी आजवर मराठी व हिंदी चित्रपटांत विविध भूमिका साकारत इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. रेणुका शहाणे अनेकदा वेगवेगळ्या गोष्टींवर त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. अशातच आता त्यांनी त्यांना बालपणी आलेल्या अनुभवांबद्दल सांगितलं आहे.
समाजात घटस्फोटित महिलेकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन वेगळा असतो. आजच्या काळातही यामध्ये फार बदल झालेला नाही. जोडीदाराबरोबर न पटल्याने विभक्त होण्याचा निर्णय घेणाऱ्या, स्वत:च्या सुखाचा विचार करणाऱ्या स्त्रियांकडे कसं वेगळ्या नजरेने पाहिलं जातं याबद्दल रेणुका यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
रेणुका यांनी ‘अमुक तमुक’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या आई-वडिलांचा त्या लहान असताना घटस्फोट झालेला आणि यामुळे त्यांना लोकांकडून काय अनुभव आले याबद्दल त्यांनी सांगितलं आहे. या पॉडकास्टमध्ये रेणुका यांना त्यांच्या आई ज्येष्ठ लेखिका शांता गोखले यांच्या घरी जन्मल्यानंतर तुमचं बालपण कसं गेलं, त्या आठवणी कशा होत्या, याबद्दल विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “फारच विचित्र होतं. आम्ही शिवाजी पार्कसारख्या ठिकणी राहत होतो, जिथे मध्यमवर्गीय मराठी लोक राहातात; खूप छान बालपण गेलं.”
रेणुका शहाणे यांची आई-वडिलांच्या घटस्फोटाबद्दल प्रतिक्रिया
बालपणातील आठवणी सांगत रेणुका पुढे म्हणाल्या, “मी ८ वर्षांची असेपर्यंत आई, बाबा आणि आम्ही सगळीकडे फिरत होतो; कारण बाबा नेव्हीमध्ये अधिकारी होते, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी राहिलो आणि ते तसंच सुरू राहिलं असतं, पण माझे आई-बाबा विभक्त झाले, त्यामुळे आम्ही मुंबईत आलो आणि आईच्या आईकडे शिवाजी पार्कमध्ये राहायला लागलो, तो एक काळ वेगळा होता.”
आई-वडिलांच्या घटस्फोटाबद्दल पुढे त्या म्हणाल्या, “आई आणि बाबांचा घटस्फोट झाल्यामुळे आम्ही वेगळे होतो. लोकांसाठी आम्ही फार विचित्र होतो की, हे कसं काय होऊ शकतं? कारण त्यावेळी घटस्फोट ही कल्पनाच फार नवीन होती. त्यावेळी माझ्या आईबद्दल लोकांची फार चांगली मतं नव्हती. माझ्या मैत्रिणींचे जे आई-वडील होते त्यांना असं वाटायचं की, कसं काय अशी एक स्त्री असू शकते, जी एकल पालकत्व करतेय. बाबा अधून मधून आम्हाला भेटायला यायचे, त्यांचं आणि आईचं नातं सुंदर होतं.”
रेणुका शहाणे याबद्दल पुढे म्हणाल्या, “अनेक लग्न झालेली जोडपी जी फक्त एकत्र आयुष्य काढत होती, त्यांच्यापेक्षा जास्त चांगले मित्र-मैत्रिणी माझे आई-वडील होते, त्यामुळे कधी कधी तुम्ही नवरा बायको म्हणून एकत्र नाही राहू शकत. लग्नानंतर नवरा बायको म्हणून तुमच्या अपेक्षा वेगळ्या असू शकतात, पण मित्र-मैत्रीण म्हणून राहूच शकता आणि आदरही करू शकता; तसंच त्यांनी आयुष्यभर ते नातं जपलं. आता बाबा नाहीयेत, पण जोपर्यंत होते तोपर्यंत.”
रेणुका शहाणे यांनी सांगितला ‘तो’ अनुभव
रेणुका शहाणे पुढे म्हणाल्या, “त्यामुळे त्याचा आम्हाला खूप पाठिंबा मिळाला; कारण जर त्यांच्यामध्ये चिडचिड, वाद हे सगळं जर आम्ही पाहिलं असतं तर आमचं बालपण कलूषित झालं असतं असं मला वाटतं. पण इकडे हा मुद्दाच नव्हता. इथे हा मुद्दा होता की बाहेरचे लोक ठरवत होते की, हे त्यांच्या घरात इतके आनंदी कसे राहू शकतात. आपण त्यांना काहीतरी बोलून किंवा काहीतरी करून कसा त्रास देऊ शकतो, असं काहीतरी करायचे. कारण त्यांच्या मते हे असं उदाहारण समाजासमोर नसलं पाहिजे.”
बालपणात आलेल्या अनुभवांबद्दल अभिनेत्री पुढे म्हणाल्या, “लोकांना वाटायचं की, आई-वडील विभक्त असलेल्या घरातील मुलं जर इतक्या छान पद्धतीने मोठी होत असतील तर या संस्थेविषयी लोकांसमोर वेगळा दृष्टिकोन तयार होईल, त्यामुळे जे मित्र-मैत्रिणी आहेत त्यांच्या मनातही येऊ शकतं की आमच्या घरात जशी भांडणं होतात तशी यांच्या घरात होत नाहीत, असंही सुखी राहता येतं; तर तसं उदाहारण मिळू नये म्हणून काही लोकांना आमच्यापासून लांब ठेवलं जायचं.”
रेणुका पुढे म्हणाल्या, “लहानपणी मला असं वाटायचं की, तुम्ही मला हात लावलात तर तुमचे आई-वडील लगेच काही घटस्फोट घेणार नाही आहेत. पण, यामुळे लहानपणापासूनच चार लोक काय बोलतात याचा फार विचार करायचा नाही याची सवय लागली होती. मला आवडलंच असतं की आई-बाबांनी एकत्र राहावं वगैरे, कोणाला नको असतं; पण आपल्याला जेव्हा कळतं की आई-वडील एक व्यक्तीसुद्धा आहेत, याची मला खूप लवकरच जाणीव झाली. अनेक लोकांचा आई-वडिलांनी फक्त आपल्यासाठी जगावं असाच दृष्टिकोन असतो, पण ते आमचं झालं नाही; त्यामुळे त्या दोघांना आनंद मिळो, त्यांना जे करायचं असेल ते करावं असं मला वाटायचं.”