Rhea Chakraborty Jail Experience : दिवंगत बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे १४ जून २०२० रोजी आकस्मिक निधन झाले. त्याच्या निधनाच्या वृत्ताने चाहत्यांसह सर्वांनाच मोठा धक्का बसला. याप्रकरणी रिया चक्रवर्तीचं नाव चर्चेत आलं होतं. अशातच काही दिवसांपूर्वी, सीबीआयने या प्रकरणासंबंधित क्लोजर रिपोर्ट दाखल केला आणि तिला क्लीन चिट दिली.
सुशांत सिंह राजपूतप्रकरणी रियाला तुरुंगात जावं लागलं होतं. रिया तुरुंगात २८ दिवस होती. तुरुंगातील या अनुभवाबद्दल रियाने प्रतिक्रिया दिली आहे. तसंच क्लीन चिट मिळाल्यानंतर तिची काय भावना होती, याबद्दलही सांगितलं आहे. एनडीटीव्हीच्या एका कार्यक्रमात तिने आयुष्यातील या कठीण टप्प्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी रियाला विचारलं गेलं की, “जर तुझ्या तुरुंगातील अनुभवांवर एखादा सिनेमा बनवायचा असेल आणि तू त्या सिनेमाची दिग्दर्शिका असशील, तर मुख्य भूमिका कोणत्या कलाकाराला देशील?”, यावर रिया उत्तर देत म्हणाली, “मी माझ्या कोणत्याही सहकलाकाराला माझ्या आयुष्यातील ही दुर्दैवी भूमिका देणार नाही. माझ्या कोणत्याही सहकलाकारासाठी असा वाईट अनुभव नकोच, असं मी म्हणेन.”
यापुढे ती म्हणाली, “तुरुंगात गेल्यानंतर माणूस पूर्णपणे बदलतो. त्याचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे, तुम्हाला घरच्या अन्नाची किंमत कळते. घरचं साधं डाळ-भातसुद्धा पिझ्झासारखा भारी वाटतो आणि सर्वात शेवटचं म्हणजे, तुमचे खरे मित्र असतील; तर ते ३-४ च असतात हे जाणवतं. बाकी सगळा फक्त दिखावा असतो.”
यापुढे रियाने तुरुंगातील नागीण डान्सबद्दल सांगितलं. ती म्हणाली, “मला जेव्हा कोर्टाने जामीन दिला, तेव्हा तिथल्या काही महिलांनी मला डान्स करायला सांगितला. जामिनाच्या दिवशी मी त्यांच्यासाठी ‘नागीण डान्स’ केला. मी विचार केला, कदाचित पुन्हा कधी त्यांना भेटता येणार नाही. पण, त्याक्षणी त्यांच्या चेहऱ्यावर जरा थोडंसं हास्य आणता आलं तर…”
रिया चक्रवती इन्स्टाग्राम पोस्ट
सर्व आरोपातून मुक्तता (क्लीन चिट) मिळाल्यानंतरच्या भावना सांगताना रिया म्हणाली, “त्या दिवशी घरातील सगळे रडले. मी माझ्या भावाला मिठी मारली आणि आम्ही दोघंही रडलो. आई-बाबांकडे पाहिलं आणि जाणवलं की, आता आपण पूर्वीप्रमाणे निष्काळजी, बिनधास्त राहू शकत नाही. त्या एका क्षणाने सगळं बदलून टाकलं. क्लीन चीट मिळाली तेव्हा मला खूप आनंद झाला असं नाही. कारण मला माहीत होतं, माझा अत्यंत जवळचा माणूस (सुशांत) पुन्हा येणार नाही आणि हे कोणीही बदलू शकत नाही.”
पुढे ती म्हणते, “आई-वडिलांसाठी थोडा दिलासा मिळाला असं वाटलं. ते समाजात वावरतात, रोज अनेक प्रश्नांना सामोरं जातात. आता कदाचित ते थोडं मोकळेपणाने जगू शकतील. या सगळ्यात मला कधीच माझ्या पद्धतीने दुःख व्यक्त करता आलं नाही, पण आता माझं दुःख संपलं आहे आणि मी ठीक आहे.”