Riteish Deshmukh and Akshay Kumar: रितेश देशमुख मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये कधी गंभीर, कधी विनोदी भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

अभिनेता ‘हाऊसफुल’च्या फ्रँचायजीमध्ये, तसेच ‘तेरे नाल इश्क हो गया’, ‘जाने कहाँ से आयी है’, ‘क्या सुपर कुल है हम’, ‘डरना जरुरी है’, ‘हे बेबी’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. अनेक कलाकारांबरोबर त्याने स्क्रीन शेअर केली आहे.

रितेश देशमुख व अक्षय कुमारदेखील अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसले आहेत. त्यांनी ‘हाऊसफुल’, ‘नमस्ते लंडन’ अशा चित्रपटांमध्ये स्क्रीन शेअर केली आहे. पडद्यावर त्यांच्या जोडीला जितके प्रेम मिळते तितकीच त्यांची ऑफस्क्रीन मैत्रीदेखील लक्ष वेधून घेते.

आता अक्षय कुमारच्या वाढदिवसानिमित्त रितेशने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्याने अक्षयला ‘पार्टनर इन क्राइम’ असे म्हटले आहे.

रितेश देशमुख म्हणाला…

रितेशने लिहिले, “माझ्या मित्राला, भावाला आणि माझ्याबरोबर खोड्या काढणाऱ्या जोडीदाराला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा! तुझे आरोग्य निरोगी राहू दे, प्रेम मिळू दे, तू कायम हसत राहावास, या माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. आपण ऑनस्क्रीन व ऑफस्क्रीन खूप चांगला वेळ एकत्र घालवला आहे. भविष्यात बऱ्याच गोष्टी एकत्र करायच्या आहेत, खूप प्रेम” असे म्हणत अभिनेत्याने अक्षय कुमारसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. तसेच अक्षय कुमारला टॅगदेखील केले आहे. रितेशच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत अक्षय कुमारला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अक्षय कुमार व रितेश देशमुख नुकतेच ‘हाऊसफुल ५’मध्ये एकत्र दिसले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. यामध्ये संजय दत्त, नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ असे अनेक कलाकार दिसले होते. अक्षय कुमार २०२५ मध्ये ‘स्काय फोर्स’, ‘हाऊसफुल ५’, ‘कनप्पा, केसरी : चाप्टर २’ या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

दरम्यान, रितेश देशमुख ‘रेड २’मध्ये दिसला होता. या चित्रपटात अजय देवगण प्रमुख भूमिकेत होता. रितेशच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे दिसले.