Riteish Deshmukh’s Vral Video: अभिनेता रितेश देशमुख नुकताच ‘हाऊसफुल ५’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून प्रेम मिळत आहे. ६ जूनला प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची अजूनही बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरू आहे.

२० जूनला रितेशची पत्नी व लोकप्रिय अभिनेत्री जिनिलीया देशमुख व आमिर खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला सितारे जमीन पर हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. चित्रपटांशिवाय रितेश व जिनिलीया हे लोकप्रिय सेलेब्रिटी जोडपे आहे. त्यांना अनेक जण दादा-वहिनी म्हणून ओळखतात. या जोडप्याचे नेहमीच कौतुक होताना दिसते. आता मात्र एका व्हिडीओमुळे रितेश देशमुख चर्चेत आला आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. बॉलीवूड हेल्पलाईन या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाच्या प्रीमियरला जिनिलीयासह रितेश देशमुखने हजेरी लावली होती. त्यावेळी गर्दीतून रितेश जिनिलीयाला घेऊन स्क्रीनिंगच्या ठिकाणी घेऊन जात होता. त्यावेळी एक मुलगा त्याच्याकडे सेल्फी काढण्यासाठी आला. त्याने फोटोसाठी विचारले; पण रितेशने त्याला फोटो काढू दिला नाही. सुरक्षा रक्षकाने त्या मुलाला बाजूला सारले. त्यावेळी त्या मुलाला वाईट वाटल्याचे दिसत आहे.

नेटकरी काय म्हणाले?

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर अनेक कमेंट्स आल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक नेटकऱ्यांनी रितेशचे हे वागणे आवडले नसल्याचे म्हटले आहे; तर काहींनी राग व्यक्त केला आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “पहिल्यांदा मला रितेशचा अॅटिट्यूड आवडला नाही”. दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हते. हे खूप चुकीचे वागणे आहे”.

एका नेटकऱ्याने रितेशला टॅग करीत लिहिले, “कल्पना कर की, त्याच्या पालकांनी त्याला तुझ्याकडे पाठवले असेल. तो शांतपणे तुझ्याकडे आला आणि सेल्फी काढण्याचा प्रयत्न करीत होता. त्यात चुकीचे काय आहे. प्रेमाने वाग”. तसेच “हे वागणे खूप उद्धट आहे. तुझ्या चेहऱ्यावरचे हावभाव खूप काही सांगतात”, “काहींनी अपेक्षाभंग झाला”, अशाही अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रितेश देशमुख नुकताच ‘हाऊसफुल ५’मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामध्ये अक्षय कुमार, श्रेयस तळपदे, नाना पाटेकर असे अनेक कलाकार दिसत आहेत. तसेच, जिनिलीयाची प्रमुख भूमिका असलेल्या ‘सितारे जमीन पर’ने दोन दिवसांत ३० कोटींहून अधिक कमाई केली आहे. आता येत्या काही दिवसांत हा चित्रपट किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.