मराठीसह बॉलीवूडमध्ये आपली ‘लय भारी’ ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणून रितेश देशमुखला ओळखलं जातं. महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख म्हणजेच वडिलांच्या परवानगीने राजकारणापेक्षा वेगळं क्षेत्र निवडत रितेशने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. “माझ्या नावाची मी काळजी घेतो, तुझ्या नावाची तू काळजी घे” वडिलांनी दिलेल्या या एका सल्ल्यामुळे रितेश देशमुखचं संपूर्ण आयुष्य बदललं होतं. त्यांना दिलेल्या शब्दानुसार आज रितेशने इंडस्ट्रीत स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. कुटुंब, करिअर, जिनिलीयाचा पाठिंबा याविषयी अभिनेत्याने नुकत्याच देवयानी पवारच्या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.

वडिलांबद्दल सांगताना अभिनेता म्हणाला, “मला असं वाटतं आपले संस्कारच आपल्याला घडवतात. त्यामुळे विशिष्ट वयात आपल्यावर कसे संस्कार होतात हे खूप महत्त्वाचं असतं. मी माझ्या वडिलांकडून आयुष्यात प्रत्येक गोष्ट शिकलो. आमचं संपूर्ण बालपण बाभळगावात म्हणजेच लातूरमध्ये गेलं. त्यामुळे आजही सुट्ट्या पडल्या की, मुलांना घेऊन आम्ही लातूरला गावी जातो. त्याठिकाणी आम्ही अनेक सण एकत्र साजरे करतो.”

हेही वाचा : “मेरे दो अनमोल रतन”, पती व लेकासाठी नम्रता संभेरावची खास पोस्ट, ‘नाच गं घुमा’बद्दल म्हणाली, “माझा रुद्राज…”

अभिनेता पुढे म्हणाला, “आपल्या गावाशी आपली नाळ कायम जोडली गेलेली असते. आयुष्यात तुम्हाला ‘आदर’ मिळणं यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीच नाहीये ही सर्वात मोठी शिकवण त्यांनी मला दिली. तुम्हाला वाटतं एखाद्याने तुमचा आदर करावा, तर सर्वप्रथम तुम्ही संबंधित व्यक्तीचा आदर करायला शिकलं पाहिजे.”

“आमच्या घरी कोणीच एकमेकांना अरे-तुरे बोलत नाहीत. माझे आजोबा मला तुम्ही बोलायचे. मी माझ्या दोन्ही भावांना आदराने आम्ही-तुम्ही म्हणतो. माझी दोन्ही मुलं मला आदराने आवाज देतात. ही शिकवण माझ्या वडिलांकडून मला मिळाली. बऱ्यादा लोक सांगतात ‘अरे मला तू म्हण…तुम्ही बोलू नकोस’ पण, ते मला आता जमत नाही. कारण, जी शिकवण आपल्याला मिळते तिच कायमस्वरुपी राहते. अगदी काही जवळचे मित्र असतील तरच मी ‘तू’ वगैरे म्हणतो.” असं रितेश देशमुखने सांगितलं.

हेही वाचा : मास्तरीणबाईंच्या ऑफस्क्रीन कुटुंबाला पाहिलंत का? शिवानी रांगोळेने शेअर केला लग्नातील खास फोटो

दरम्यान, रितेश देशमुखच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर २०२२च्या अखेरिस प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘वेड’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. यानंतर आता अभिनेता लवकरच ‘हाऊसफुल ५’ चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय यंदाच्या शिवजयंतीच्या मुहूर्तावर रितेशने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित एका नवीन ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केलेली आहे. हा चित्रपट २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.