Riteish Deshmukh : मराठीसह बॉलीवूड मनोरंजन विश्वात आपलं अढळ स्थान निर्माण करणारा लोकप्रिय अभिनेता म्हणून रितेश देशमुखला ओळखलं जातं. आजची तरुणपिढी रितेशला आपला आदर्श मानते. ‘बिग बॉस मराठी’ होस्ट केल्यापासून महाराष्ट्राच्या घराघरांत त्याला रितेश भाऊ अशी हाक मारली जाते. अभिनेत्याचे संस्कार, सर्वांना आदराची वागणूक देणं, प्रत्येकाचा उल्लेख सन्मानाने करणं अशा चांगल्या स्वभावामुळे रितेशने नेहमीच चाहत्यांचं मन जिंकून घेतलं आहे.

अभिनेता सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. रितेश देशमुखने नुकताच शेअर केलेला सेटवरचा व्हिडीओ सध्या सर्वत्र चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये रितेशने एका लहान मुलाला मोठं होऊन काय व्हायचंय असा प्रश्न विचारल्याचं पाहायला मिळतंय.

मोठा होऊन मिलिटरी चीफ व्हायचंय हे चिमुकल्याने दिलेलं उत्तर ऐकून रितेश भारावून गेला होता. त्याने याचा खास व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे.

रितेश देशमुख व लहान मुलातील संवाद…

रितेश देशमुख – मला सांगा तुम्हाला मोठं झाल्यावर काय व्हायचंय?

लहान मुलगा – मला मिलिटरी चीफ आणि अभिनेता

रितेश – अच्छा… मिलिटरी चीफ का व्हायचंय तुम्हाला?

लहान मुलगा – कारण, मी भारतासाठी सर्वांचं संरक्षण करणार…

रितेश – संरक्षण करणार…वॉव छान! मला खरंच आवडलंय हे…तुम्ही आपल्या देशांचं चांगलं संरक्षण कराल का?

लहान मुलगा – हो

रितेश – वाह… म्हणजे आमचं भविष्य तुमच्या हातात सेफ आहे.

लहान मुलगा – हो, सर्वांचं Future सेफ असेल.

रितेश – थँक्यू! तुमचे खूप खूप आभार

रितेश देशमुखने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये, “आपलं भविष्य सेफ आहे #राजाशिवाजी” असं लिहिलं आहे. यावरून अभिनेत्याने शेअर केलेला हा व्हिडीओ त्याच्या आगामी ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या सेटवरचा असल्याचं स्पष्ट होत आहे.

दरम्यान, ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचं दिग्दर्शन रितेश देशमुख करणार असून याची निर्मिती ज्योती देशपांडे व जिनिलीया देशमुख करणार आहेत. सध्या या सिनेमाचं शूटिंग चालू आहे. याशिवाय आता लवकरच अभिनेता ‘हाऊसफुल ५’ या बॉलीवूडच्या मल्टिस्टारर सिनेमात झळकणार आहे.