Riteish Deshmukh’s special post for wife Genelia : रितेश देशमुखने सोशल मीडियावर त्याची बायको जिनिलीयासाठी एक खास पोस्ट केली आहे. अभिनेत्याने यामध्ये त्याची दोन मुलं व जिनिलीयाबरोबरचा एक फोटो शेअर केला. त्या फोटोद्वारे त्याने जिनिलीयाचं तिच्या नवीन चित्रपटासाठी कौतुक केलं आहे. जिनिलीयाचा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट २० जून रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. तिच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगला रितेशने हजेरी लावली होती. यावेळी त्याच्यासह आमिर खान व जिनिलीया यांना पाठिंबा देण्यासाठी बॉलीवूडमधील अनेक प्रसिद्ध कलाकार मंडळी उपस्थित होती. स्पेशल स्क्रीनिंगनंतरही रितेशने जिनिलीयासाठी पोस्ट करीत तिला व आमिरला चित्रपटाकरिता शुभेच्छा दिल्या होत्या. आता रितेशने त्याच्या बायकोसाठी एक नवीन पोस्ट केली आहे.

रितेशने इन्स्टाग्रामवर पोस्ट करीत ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाबद्दल म्हटलं आहे की, “‘सितारे जमीन पर’ चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद आणि चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहून खूप आनंद होत आहे. तुझा नवरा म्हणून मला अभिमान वाटतोय. अभिनंदन बायको”. यावेळी पोस्टमध्ये जिनिलीया, रितेश आणि त्यांच्या दोन मुलांचा गोड फोटोही पाहायला मिळतोय. रितेशने यापूर्वीसुद्धा या चित्रपटाचं कौतुक केलं होतं. आणि त्याला हा चित्रपट आवडल्याचं म्हणत प्रेक्षकांनाही हा चित्रपट पाहायला सांगितला होता.

‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट २० जून २०२५ रोजी प्रदर्शित झाला. प्रसिद्ध अभिनेता आमिर खान व जिनिलीया देशमुख यामधून मुख्य भूमिकांत झळकत आहेत. हे दोघेही पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. तर ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटालाही सध्या प्रेक्षकांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. या चित्रपटाने प्रदर्शनानंतर दोन दिवसांत ३२.४० कोटींची कमाई केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, जिनिलीया व रितेश हे दोघेसुद्धा त्यांच्या आगामी चित्रपटातून एकत्र झळकणार आहेत. रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटातून रितेश व जिनिलीया एकत्र झळकणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात बॉलीवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील काही प्रसिद्ध कलाकारही पाहायला मिळणार आहेत. १ मे २०२६ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.