१९८२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गांधी’ चित्रपटाची आठवण जरी काढली तरी मराठी प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचं नाव येतं. आजवर त्यांनी मराठीसह बॉलीवूड चित्रपटांमध्ये आपला विशेष ठसा उमटवला आहे. ‘बाईपण भारी देवा’च्या यशानंतर अलीकडेच त्या ‘आता वेळी झाली’ या चित्रपटात झळकल्या होत्या. आपल्या सिनेकारकिर्दीचा प्रवास त्यांनी नुकत्याच एबीपी माझा कट्टाला दिलेल्या मुलाखतीत सांगितला. तसेच ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटादरम्यानची खास आठवण यावेळी त्यांनी सांगितली.

राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटात रोहिणी हट्टंगडी यांनी संजय दत्तच्या आईची म्हणजे पार्वती शर्मा ही भूमिका साकारली होती. हा चित्रपट २००३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. परंतु, आजही घराघरांत प्रत्येकाच्या मनात या चित्रपटाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. टेलिव्हिजनवर आवडीने ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपट पाहिला जातो.

हेही वाचा : “माझ्या आयुष्यात ‘दाजिबा’…”, साडी नेसून पुरस्कार सोहळ्याला पोहोचली सारा अली खान, आवडत्या मराठी पदार्थाचं सांगितलं नाव

रोहिणी हट्टंगडी या चित्रपटाबद्दल सांगताना म्हणाल्या, “राजूजींनी मला पहिल्यांदा चित्रपटासाठी विचारलं तेव्हा मी थोडी साशंक होते. पण, त्यानंतर त्यांनी मला तुम्ही कथा ऐका आणि त्यानंतर ठरवा असं सांगितलं. राजूजींनी मला अर्ध्यापर्यंत सगळी कथा सांगितली. तेव्हाच माझ्या मनात आलं की, हा काहीतरी वेगळा चित्रपट आहे आणि आपण केला पाहिजे. भूमिका छोटी आहे की मोठी याचा विचार न करता मी चित्रपटासाठी तयार झाले होते. मला कथा ऐकून त्या चित्रपटाचं फक्त भाग व्हायचं होतं.”

हेही वाचा : राखी सावंत बुरख्याच्या आत बिकिनी घालून…; फराह खानने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “तिच्याबरोबर काम करणं…”

रोहिणी हट्टंगडी पुढे म्हणाल्या, “मुन्नाभाईच्या निमित्ताने जवळपास १३ वर्षांनी मला दत्त साहेबांबरोबर पुन्हा काम करायला मिळालं. त्याआधी ‘कुरबान’मध्ये आम्ही एकत्र काम केलं होतं. संजय दत्तबरोबर काम करण्याची ती माझी पहिलीच वेळ होती. मला खरंच ती कथा खूप आवडली होती. त्यामुळे भूमिका किती वेळाची आहे हे न पाहता मी कथेकडे पाहून चित्रपटासाठी होकार दिला.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटात संजय दत्त, सुनील दत्त, अर्शद वारसी, ग्रेसी सिंग, बोमन इराणी, जिमी शेरगिल, रोहिणी हट्टंगडी, प्रिया बापट यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.