भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर ही कुणी बॉलिवूड सेलिब्रिटी नाही. पण ती एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमीही नाही. सोशल मीडियासह सर्वच माध्यमांमध्ये तिच्या नावाच्या अनेक चर्चा होताना दिसतात. सोशल मीडियावर तिचा चांगलाच चाहतावर्ग आहे. सारा तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच ती बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहेत.
सारा तेंडुलकर अभिनय क्षेत्रात प्रवेश करेल का, असा प्रश्न अनेकदा तिला विचारण्यात आला आहे. अखेर साराने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. तसंच तिला एका गोष्टीची भीती वाटत असल्याचंही तिने सांगितलं आहे. साराने नुकतंच ‘व्होग इंडिया’ला मुलाखत दिली. यावेळी तिनं अभिनय क्षेत्रात जाण्याची इच्छा नसल्याचं सांगितलं. तसंच अभिनय हे तिच्या स्वभावाशी सुसंगत नाही, असं साराला वाटतं.
याबद्दल सारा म्हणाली, “मला कॅमेऱ्याची भीती वाटते. अभिनय समाधानापेक्षा अधिक मला मानसिक दबाव देतो. म्हणून मी अनेक ऑफर्स नाकारल्या आहेत. मी फक्त त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करते, ज्या मला योग्य वाटतात. मी प्रत्येक गोष्टीला हो म्हणत नाही. मला अभिनयात रस नाही.” पुढे साराने हेही कबूल केलं की, तिचा स्वभाव हा अंतर्मुख आहे. प्रसिद्धीपासून दूर राहणं आणि स्वतःचं आयुष्य शांतपणे जगणं हे तिला अधिक जवळचं वाटतं.
सारा तेंडुलकर वडील सचिन तेंडुलकर यांच्याप्रमाणे क्रिकेट क्षेत्रात आली नाही. खेळ हा तिचा आवडीचा विषय कधीच नव्हता. त्याऐवजी तिने आईच्या क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला. सचिनची पत्नी अंजली ही बालरोगतज्ज्ञ आहे. त्यामुळे आईच्या पावलावर पाऊल ठेवत साराने बायोमेडिकल सायन्समध्ये पदवी घेतली. मग पुढे युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून क्लिनिकल न्यूट्रिशन आणि पब्लिक हेल्थमध्ये पदव्युत्तरचे शिक्षण घेतलं आहे.
सारा ही केवळ क्रिकेटपटूची मुलगी म्हणून नव्हे, तर स्वतःच्या गुणांमुळेही चर्चेत राहिली आहे. ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून, तिच्या फोटोंमुळे ती आजच्या युवापिढीमध्ये विशेष लोकप्रिय आहे. तिच्यात नम्रता आणि सौजन्य हे गुण आहेत. तिचा अभ्यासात रस असल्याचं तिच्या शैक्षणिक कारकिर्दीतून दिसून येतं.
सारा तेंडुलकर अनेकदा ब्रँड प्रमोशन आणि मॉडेलिंग करताना दिसते. यामुळे तिचे अनेक चाहते तिला भविष्यात चित्रपटांमध्ये दिसण्याबद्दल विचारणा करत होते. मात्र आता यावर साराने थेट ‘मला कॅमेऱ्याची भीती वाटते’ असं म्हटलं आहे. तसंच तिने आलेल्या चित्रपटांच्या ऑफर्सही नाकारल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे तिच्या अनेक चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.