Sai Pallavi Social Media Trolling : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील काही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री साई पल्लवी. आपल्या उत्तम अभिनयाने तिने अनेक चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तिच्या साध्या लूकचं चाहते नेहमीच कौतुक करत असतात. पण अलीकडेच साई पल्लवी तिच्या एका फोटोमुळे चर्चेत आली आहे.

आपल्या साधेपणा आणि पारंपरिक लूकसाठी ओळखली जाणारी साई पल्लवी सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. अनेक कार्यक्रमांमधून अभिनेत्री सहसा साड्या किंवा पारंपरिक लूकमध्ये दिसते. याचसाठी तिचे चाहते कौतुक करत असतात. पण तिच्या बहिणीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमुळे ती सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

खरंतर, साई पल्लवी तिच्या बहिणीबरोबर सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेली होती. या सुट्ट्यांचे काही फोटो तिच्या बहिणीने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत, ज्यात साई पल्लवी समुद्रकिनारी शॉट ड्रेसमध्ये असल्याचं दिसत आहे. तिचे हेच फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत आणि या फोटोवर कमेंट्स करत अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे.

साई पल्लवीच्या बहिणीने शेअर केलेल्या या फोटोखालील कमेंट्समध्ये एकाने साई पल्लवीला ट्रोल करत “चित्रपटांत पारंपरिक पेहरावात दिसणारी साई पल्लवी खऱ्या आयुष्यात बिकिनी घालते?” असं म्हटलं आहे, तर दुसऱ्याने “हीसुद्धा इतर काही अभिनेत्रींसारखीच आहे, हिचा पारंपरिक लुक फक्त स्क्रीनपुरताच आहे.” अशी कमेंट केली आहे. तसंच आणखी एकाने “जर साई पल्लवी स्लीव्हलेस अन् छोट्या कपड्यांमध्ये दिसत आहे, तर मग भारतीय संस्कृतीचं रक्षण कोणत्या अभिनेत्रीने करायचं? साई पल्लवीचे सर्व चाहते या प्रश्नाचं उत्तर देतील का?” अशी कमेंट केली आहे.

एकीकडे साई पल्लवीच्या कपड्यांवरून तिला ट्रोल केलं जात असलं; तरी तिच्या अनेक चाहत्यांनी तिची बाजू घेतली आहे. या फोटोखाली एकाने “अहो, ती बिकिनी घालणारी साई पल्लवी नव्हे, तर तिची बहीण होती. साई पल्लवीने याआधीही स्लीव्हलेस कपडे परिधान केले आहेत. तिने काय कपडे घालावे? आणि काय नाही? हे ठरवणारे आपण कोण? तिने काय परिधान केलं पाहिजे आणि काय नाही, याचं तिला स्वतःचं स्वातंत्र्य आहे.”

साई पल्लवीच्या फोटोवरील कमेंट्स
साई पल्लवीच्या फोटोवरील कमेंट्स

तर आणखी एकाने साई पल्लवीची बाजू घेत “प्रत्येकाला आपल्याला हवे ते कपडे घालण्याचा पूर्ण अधिकार आहे. इतरांच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करणं बंद करा. साई पल्लवीने एका मुलाखतीत ‘माझी वैयक्तिक पसंती साधेपणा आहे, पारंपरिकता नाही’ असं सांगितलं होतं, त्याचा अर्थ असा नाही की ती इतर कपड्यांमध्ये वाईट दिसते.” दरम्यान, अनेकांनी सुंदर, सोज्वळ अशा अनेक प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.