Saif Ali Khan : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर गुरुवारी मध्यरात्री त्याच्या घरात हल्ला झाला. घरात शिरलेल्या हल्लेखोराने त्याच्यावर चाकूने सहा वार केले, यात सैफ गंभीर जखमी झाला. या घटनेला तीन दिवस उलटले असून पोलीस त्या हल्लेखोराचा शोध घेत होते, या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. यानंतर पोलिसांनी सैफवर हल्ला ज्या चाकूने करण्यात आला तो चाकूही आता पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी हा चाकू फॉरेन्सिक टीमकडे पाठवला आहे.

नेमकं काय घडलं?

१६ जानेवारीच्या रात्री साधारण ३ वाजण्याच्या सुमारास सैफ अली खान याच्या घरात एक हल्लेखोर शिरला. तो चोरीच्या उद्देशाने शिरला असावा असा अंदाज वर्तवण्यात आला. त्याला घरातल्या एका गृहसेविकेने पाहिलं आणि आरडाओरडा केला. त्यावेळी तो तिच्याशी हुज्जत घालू लागला. घडला प्रकार ऐकून सैफ अली खान काय झालं आहे ते बघायला बाहेर आला. त्यावेळी या दोघांची झटापट झाली. या झटापटीत सैफ अली खानवर हल्लेखोराने चाकू हल्ला केला. चाकूचे सहा वार सैफवर करण्यात आले आहेत. यानंतर त्या हल्लेखोराने पळ काढला. दरम्यान सैफ अली खानला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

सैफवर दोन शस्त्रक्रिया

सैफ अली खानवर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सैफ अली खान रुग्णालयात असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होते आहे अशी माहिती डॉक्टरांच्या पथकाने दिली. तसंच सैफची प्रकृती आता व्यवस्थित आहे असंही डॉक्टरांच्या चमूने सांगिलं. पोलिसांनी सैफवर ज्याने हल्ला केला त्याच्या शोधण्यासाठी १० हून अधिक पथकं तयार केली आहेत. दरम्यान सैफच्या पाठीत चाकूचा तुकडा अडकला होता जो शस्त्रक्रिया करुन काढण्यात आला. सैफ अली खान आता आऊट ऑफ डेंजर आहे असंही डॉक्टरांनी सांगितलं. तर मुंबई पोलिसांनी सैफ अली खानवर ज्या चाकूने हल्ला करण्यात आला तो चाकू ताब्यात घेतला आहे आणि तो चाकू फॉरेन्सिक टीमकडे पाठवला आहे. त्याबाबतचा अहवाल येणं अद्याप बाकी आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर करीना कपूरची पोस्ट

“हा आम्हा कुटुंबीयांसाठी प्रचंड आव्हानात्मक दिवस होता. गेल्या काही तासांमध्ये नेमकं काय घडलंय…या सगळ्याचा विचार आम्ही अजूनही करत आहोत. आमचं कुटुंब या कठीण काळातून जात असताना, मी मीडिया आणि पापाराझींना आदरपूर्वक आणि नम्रपणे विनंती करते की, त्यांनी सतत अनुमान काढणं आणि या घटनेचं कव्हरेज करणं टाळावं. या काळात तुम्ही दाखवलेल्या प्रेमाबद्दल आणि तुम्ही सर्वांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी निश्चितच आभारी आहे. मात्र, सतत एखाद्याच्या हालचालींवर लक्ष ठेवणं हा सुरक्षेसाठी मोठा धोका होऊ शकतो. मी तुम्हाला विनंती करते की, तुम्ही आमच्या प्रायव्हसीचा आदर करा. एक कुटुंब म्हणून या घटनेतून बाहेर पडण्यासाठी आम्हाला काही वेळ द्या. या संवेदनशील काळात तुम्ही केलेल्या सहकार्याबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छिते”