Saiyaara box office collection day 19: गेल्या दोन-तीन वर्षांत बॉलीवूडच्या काही मोजक्याच चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर यश मिळाल्याचे पाहायला मिळाले. विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ हा त्यापैकी एक आहे. आता त्या पाठोपाठ मोहित सुरी दिग्दर्शित ‘सैयारा’ या चित्रपटालादेखील मोठे यश मिळताना दिसत आहे.

मोहित सुरी दिग्दर्शित ‘सैयारा’ चित्रपट १८ जुलैला प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता अहान पांडे आणि अनित पड्डा प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. १९ दिवसांत या चित्रपटाने अनेक बॉलीवूड चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. आता जाणून घेऊयात या चित्रपटाने १९ व्या दिवशी एकूण किती कमाई केली. तसेच, जगभरात आणि भारतात या चित्रपटाने आतापर्यंत एकूण किती कमाई केली आहे.

‘सैयारा’ चित्रपटाने दीपिका पादुकोणच्या ‘पद्मावत’ला टाकले मागे

‘सैयारा’ने मंगळवारी म्हणजेच १९ व्या दिवशी २.५ कोटींची कमाई केली आहे. तर १९ दिवसांत चित्रपटाने संपूर्ण जगभरात ५०० कोटींहून अधिक कमाई केली आहे; तर भारतात सैयाराने ३०४.६ कोटींची कमाई केली आहे. या कमाईसह या चित्रपटाने बॉलीवूडच्या अनेक गाजलेल्या चित्रपटांना मागे टाकले आहे.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ने २०१८ साली बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने भारतात ३०२.१५ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटात शाहिद कपूर, दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह प्रमुख भूमिकेत होते. आता सैयाराने या चित्रपटाला कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे.

आता आगामी काळात हा चित्रपट सलमान खानची प्रमुख भूमिका असलेला ‘बजरंगी भाईजान’ला मागे टाकण्याची शक्यता आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरने एका निवेदनात म्हटले आहे की, सैयारा ही भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारी प्रेमकथा ठरली आहे; तर अहान पांडे व अनित पड्डा हे भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील असे नवोदित कलाकार आहेत, ज्यांच्या चित्रपटाने संपू्र्ण जगभरात ५०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.

याआधी आदित्य चोप्राचा १९९५ मध्ये दिग्दर्शित केलेला ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा आतापर्यंतचा सर्वात प्रसिद्ध रोमँटिक चित्रपट होता. यामध्ये काजोल शाहरुख खान प्रमुख भूमिकेत होते. एक कंपनी म्हणून आम्ही या ऐतिहासिक यशाचे भागीदार आहोत.

दरम्यान, १८ जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या ‘सैयारा’ या चित्रपटात क्रिशची भूमिका अहान पांडेने साकारली आहे. त्याचे या भूमिकेसाठी कौतुक होताना दिसत आहे.