Salman Khan Reaction On Controversies : बॉलीवूडमध्ये दबंग आणि सर्वांचा भाईजान म्हणून ओळखला जाणार अभिनेता म्हणजे सलमान खान. बॉलीवूडच्या सध्याच्या लोकप्रिय कलाकारांपैकी तो एक आहे. त्यानं आजवर अनेक बॉलीवूड सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यामुळे त्याचा चाहतावर्गही तितकाच आहे. आपल्या अभिनयानं चर्चेत राहणारा सलमान अनेक वादांमुळेसुद्धा चर्चेत राहिला आहे.
राजस्थानमधील चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान काळविटाची शिकार असो, ऐश्वर्या रायबरोबरचा वाद असो किंवा विवेक ओबेरॉयला धमकी दिल्याचा आरोप असो… अशा अनेक वादांमध्ये सलमानचं नाव आलं आहे. त्या सर्व वादांवर सलमाननं ‘बिग बॉस १९’च्या नुकत्याच झालेल्या भागात प्रतिक्रिया दिली आहे. ‘बिग बॉस’मध्ये अमाल मलिकनं फरहाना भट्टबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल बोलताना सलमाननं त्याच्याशी संबंधित वादावर उत्तर दिलं.
अमालच्या फरहानाबद्दलच्या असभ्य टीकेबद्दल त्याला प्रतिक्रिया देताना सलमान म्हणाला, “एखाद्या गोष्टीवर तू कशा पद्धतीनं प्रतिसाद देतोस, यावरून तुला कायम लोक ओळखतात. मी हे स्वतः अनुभवलंय. ३०–४० वर्षांपूर्वीच्या गोष्टी, मुद्दाम घडवून आणलेल्या चर्चा, ज्या प्रत्यक्षात घडल्यासुद्धा नाहीत, त्याला मी अजूनही समोर जात आहे. जे मी केलंच नाही, ते माझ्या नावानं खपवलं गेलं आहे.”
“लोक माझ्याबद्दल अनेक वाईट गोष्टी…”
त्यानंतर सलमान म्हणाला, “माझ्यावर ज्या ज्या गोष्टींबद्दलचे आरोप झाले, त्यातल्या अनेक गोष्टी मी केल्यासुद्धा नाहीत; पण आजही त्याचं ओझं माझ्यावर आहे. लोक माझ्याबद्दल अनेक वाईट गोष्टी बोलत असतात. तुला वाटतं का की, तू हे सगळं झेलू शकशील? हे जग खूप क्रूर आहे अमाल. तुझ्याबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया सहन करण्याचं मानसिक बळ आहे का?”
“मी आणि संजय दत्त वाईट अनुभवांतून…”
पुढे सलमान म्हणाला, “तू जेव्हा एखादं समाजकार्य करतोस, तेव्हा लोक म्हणतात की, हा दिखावा आहे. कुणाचा आदर करतोस, तेव्हा लोक म्हणतात की, दाखवण्यासाठी करतोय. इतक्या लहान लहान गोष्टीसुद्धा लोक लक्षात ठेवतात. मी आणि संजू (संजय दत्त) अशा अनेक अनुभवांतून गेलो आहोत, हे सगळं तुला झेलणं शक्य आहे का? सगळं जग तुझ्याविरोधात उभं राहतं आणि अशा वेळी डोकं शांत ठेवून गप्प राहावं लागतं. प्रत्येक दिवस एखाद्या लढाईप्रमाणं लढावा लागतो.”
त्यानंतर सलमाननं अमाललं म्हटलं, “तू चांगला खेळत आहेस. फक्त तुझ्या बोलण्यावर थोडं नियंत्रण ठेव आणि कुणी काय सांगतंय, त्यावर विश्वास ठेवू नकोस. अमाल आता खरोखर बदललाय, असं लोकांना वाटलं पाहिजे.”