Salman Khan Dance Video : बॉलीवूडचा भाईजान सलमान खान सध्या त्याच्या ‘दबंग टूर’च्या निमित्ताने परदेशात पोहोचला आहे. सलमान बाहेरगावी असल्याने या आठवड्यात ‘बिग बॉस’मध्ये वीकेंड का वारचं होस्टिंग दिग्दर्शक रोहित शेट्टी करणार आहे. सलमानचा चाहतावर्ग परदेशात देखील मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून भाईजानचे चाहते त्याच्या ‘दबंग टूर’ची आतुरतेने वाट पाहत होते.

सलमान खानच्या दबंग टूरचं आयोजन १४ नोव्हेंबर रोजी कतारमधील एशियन टाउन अ‍ॅम्फीथिएटरमध्ये करण्यात आलं होतं. या टूरमध्ये तमन्ना भाटिया, सुनील ग्रोव्हर, मनीष पॉल, प्रभु देवा, जॅकलिन फर्नांडिस या सेलिब्रिटींनी सलमानबरोबर परफॉर्मन्स सादर केले. सध्या या सोहळ्यातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सलमान खानने त्याच्या ‘किक’ चित्रपटातील ‘जुम्मे की रात है’ या गाण्यावर जबरदस्त डान्स केला. या गाण्यावर त्याच्यासह अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस देखील थिरकली. विशेष म्हणजे वयाच्या ५९ व्या वर्षी देखील सलमानच्या जबरदस्त एनर्जीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या कार्यक्रमात भाईजानने त्याच्या अनेक गाजलेल्या गाण्यांवर ठेका धरला होता. मात्र, या सगळ्यात सलमान खान व तमन्ना भाटिया यांचा रोमँटिक डान्स व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

सलमान व तमन्ना यांनी ‘टायगर जिंदा है’ सिनेमातील “दिल दियां गल्लां…” गाण्यावर एकत्र डान्स केला. हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल आहे. या मूळ गाण्यात प्रेक्षकांना सलमान खान व कतरिना कैफ यांची ऑनस्क्रीन जोडी पाहायला मिळाली होती. हे गाणं आतिफ असलमने गायलं आहे.

सलमानच्या चाहत्यांनी त्याच्या सगळ्या डान्स व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. विशेष म्हणजे, या वयातही भाईजानची कमाल एनर्जी पाहून प्रेक्षक थक्क झाले आहेत. यापैकी काही व्हिडीओ the_lifestyle_thread आणि फिल्मफेअरच्या इन्स्टाग्राम अकाऊंट्सवरून शेअर करण्यात आले आहेत.

दरम्यान, सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर सलमान सध्या ‘बॅटल ऑफ गलवान’च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. पुढच्या वर्षी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय तो ‘बिग बॉस १९’चा होस्ट देखील आहे.