आठवडाभरापूर्वी अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला. मुंबईतील वांद्रे भागातील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील सलमानच्या घरावर पाच राउंड फायरिंग करण्यात आली. १४ एप्रिलला पहाटे ही घटना घडली. त्यानंतर मुंबई गुन्हे तातडीने तपास करत दोन्ही आरोपींना गुजरातमधून अटक केली होती. आता या प्रकरणात गोळीबार करण्यासाठी वापरलेल्या बंदुकीबद्दल नवीन माहिती समोर आली आहे.
बंदूक शोधण्यासाठी गुन्हे शाखेचं पथक पोहोचलं सुरतला
आज तकच्या वृत्तानुसार, गोळीबार केल्यानंतर त्यांनी बंदूक सुरतच्या नदीत फेकल्याचं आरोपींनी गुन्हे शाखेला सांगितलं. त्या बंदुकीचा शोध घेण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेचे पथक सुरतला पोहोचले आहे. आरोपींनी पोलिसांना बंदूक सुरतच्या तापी नदीत फेकल्याचं म्हटलंय, सध्या पथक बंदुकीचा शोध घेत आहे.
बिश्नोई गँगने घेतलेली हल्ल्याची जबाबदारी
सलमान खानच्या घरावर पहाटे गोळीबार झाला होता. त्याच दिवशी १२ वाजताच्या सुमारास गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून वेगाने तपासचक्रे फिरवली आणि दोन्ही आरोपींना गुजरातमधील भुज येथून अटक केली होती. त्यानंतर त्यांना मुंबईत आणण्यात आलं आणि चौकशी सुरू केली. सध्या विकी व सागर दोघेही पोलीस कोठडीत आहेत.
बिहारमध्ये बंदुक चालवायला शिकले होते आरोपी
अटकेतील आरोपी विकी गुप्ता (२४ वर्षे) आणि सागर पाल (२१ वर्षे) यांनी सलमानच्या घरावर गोळीबार करण्यापूर्वी बिहारमधील चंपारण इथं बंदूक चालवण्याचा सराव केला होता. १३ एप्रिलला रात्री दोघांना बंदूक पुरविण्यात आली. अनमोल बिश्नोई इंटरनेट कॉलिंगद्वारे दोन्ही आरोपींच्या संपर्कात होता. सलमानच्या घरावर गोळीबार करण्यासाठी त्यांना आधीच एक लाख रुपये देण्यात आले होते. त्यांना चार लाख रुपयांमध्ये गोळीबाराची सुपारी देण्यात आली होती.
सलमान खान दुबईत
रविवारी (१४ एप्रिलला) गोळीबाराची घटना घडली, त्यानंतर चार दिवसांनी सलमान खान गुरुवारी दुबईला रवाना झाला. एका कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी तो दुबईला गेला असून अजूनही तिथेच आहे. तिथून माघारी परतल्यावर तो त्याची शूटिंगची कामं करेल, असं म्हटलं जातंय.