सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर दोन हल्लेखोरांनी रविवारी (१४ एप्रिल) पहाटे ५ वाजताच्या सुमारास गोळ्या झाडल्या. हे दोघेही हल्लेखोर दुचाकीवरून त्याच्या घरापर्यंत आले होते. पोलिसांनी अभिनेत्याच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेजमधून ती दुचाकी व त्या दोन संशयितांची ओळख पटवली होती. आता त्या दुचाकीसंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी या प्रकरणावर रविवारी संध्याकाळी माहिती देताना म्हटलं होतं की गोळ्या झाडणारा विशाल आणि दुचाकी चालवणारा त्याचा सहकारी दोघांनी गेल्या काही दिवसांपासून सलमान खानच्या घराची रेकी केली असावी. या घटनेत वापरलेली दुचाकी नंतर एक किलोमीटर अंतरावर एका चर्चजवळ आढळली होती. दुचाकीची नोंदणी पनवेल येथील एका रहिवाशाच्या नावावर असल्याचं समजलं. ही दुचाकी चोरीला गेली होती की नाही, याचा शोध पोलीस घेत होते, आता यासंदर्भात माहिती समोर आली आहे.

घरावर गोळीबार झाल्यानंतर सलमान खानची पहिली पोस्ट, व्हिडीओ केला शेअर

गोळीबाराच्या घटनेत वापरण्यात आलेल्या दुचाकीच्या मालकाची मुंबई पोलीस चौकशी करत आहेत, असं एका अधिकाऱ्याने सोमवारी सांगितलं. माऊंट मेरी चर्चजवळ हल्लेखोरांनी सोडून दिलेली दुचाकी नवी मुंबईतील पनवेल येथील एका व्यक्तीची आहे. ‘पीटीआय’ पनवेलचे सहाय्यक आयुक्त अशोक राजपूत यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांना दुचाकीच्या मालकाचा शोध घेण्यात यश आलंय, त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने नुकतीच ही दुचाकी दुसऱ्याला विकल्याचं उघड झालं आहे.

घरावर गोळीबार झाल्यावर सलमान खानचा मोठा निर्णय, अभिनेत्याने सांगितलं की कोणीही आता…

गुन्हे शाखेचे एक पथक पनवेलला गेले होते आणि त्यांनी दुचाकी मालक आणि इतर दोघांना चौकशीसाठी आणलं होतं, असं अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितलं. गोळीबार केल्यानंतर दोघांनी ही दुचाकी सोडून दिली आणि ते रिक्षाने वांद्रे रेल्वे स्थानकावर पोहोचले. मग त्यांनी बोरिवलीला जाण्यासाठी ट्रेन पकडली पण सांताक्रूझ स्टेशनवर उतरून ते निघून गेले, असंही त्यांनी नमूद केलं.

सलमान खानचं गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घर कसं दिसतं? पाहा Inside Photos

“आतापर्यंत आम्ही या प्रकरणात कोणालाही अटक केलेली नाही किंवा ताब्यात घेतलेलं नाही, परंतु आम्ही चौकशी करत आहोत,” असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. यासंदर्भात ‘मिड-डे’ने वृत्त दिलंय.