बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा ‘टायगर ३’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर निर्मात्यांनी ‘टायगर ३’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित केला आहे. या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना सलमानबरोबर कतरिनाचा अॅक्शन लूक पाहायला मिळत आहे.
याअगोदर २७ स्पटेंबरला ‘टायगर ३’चा टीजर प्रदर्शित करण्यात आला. या टीजरला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. तेव्हापासून या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आता अखेर प्रतीक्षा संपली आहे. ‘यशराज फिल्म्स’ने आपल्या यूट्युब चॅनेलवर ‘टायगर ३’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित केला आहे. ट्रेलरमध्ये सलमान खानसोबतच कतरिनाही जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहे.
प्रदर्शनाच्या काही वेळातच हा ट्रेलर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. ‘टायगर’ व ‘टायगर जिंदा है’नंतर प्रेक्षक पुन्हा सलमान खानला अॅक्शन अवतारात पाहण्यासाठी उत्सुक होते. या अगोदर टायगर ३ मधील सलमान आणि कतरिनाचा लूक प्रदर्शित करण्यात आला होता. या लूकला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
‘टायगर ३’बद्दल बोलायचे झाले तर हा ‘य़शराज फिल्म्स’च्या ‘स्पाय युनिव्हर्स’मधला पाचवा चित्रपट आहे. ‘टायगर ३’मध्ये सलमान खानबरोबर कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकांत दिसणार आहेत. या चित्रपटात इम्रान हाश्मीने नकारात्मक भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे. १० नोव्हेंबर २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हिंदीबरोबर तमीळ व तेलुगु भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे.