Salman Khan responds to Abhinav Kashyap : काही दिवसांपासून बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि दिग्दर्शक अभिनव कश्यप यांच्यात भांडणं सुरू आहेत. अभिनव सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांवर अनेक गंभीर आरोप केले गेले आहेत. या आरोपांना सलमान थेट उत्तर देत नसला तरी तो त्याच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधत आहे. ‘बिग बॉस’च्या शोमध्ये नुकतीच त्याने याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. स्टॅण्डअप कॉमेडियन रवी गुप्ताशी गप्पा मारताना, सलमानने अभिनवला अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

नुकत्याच झालेल्या ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान आणि रवी एक मजेशीर खेळ खेळत होते. त्यात सलमानला मुद्दाम चुकीची उत्तरं द्यायची होती. हा खेळ संपताच रवी म्हणाला, “असाच मसाला पाहिजे असतो.” त्यावर सलमान नाव न घेत म्हणाला, “अजून एक दबंग माणूस आहे, ज्यानं माझ्यासह आमिर खानवरही टीका केली आहे. गेल्या वीकेंडला मी फक्त एवढंच म्हणालो होतो, ‘टीका-टिप्पणी करीत बसण्यापेक्षा काम करा’. त्यावर मला फक्त विचारायचंय की, काम मिळालं का भाऊ?”

“दुसरा सिनेमा दिला होता पण…” : सलमान खान

त्यानंतर सलमानने अभिनवच्या टीकेबद्दल मत व्यक्त करीत म्हटलं, “तुम्ही इतके हुशार असाल, तर तुम्हाला समजलं पाहिजे की, अशा पद्धतीनं सगळ्यांवर टीका करून, आयुष्यात फार काही मिळत नाही. आम्ही तुम्हाला दुसरा सिनेमा देऊ केला होता; पण तुम्ही नकार दिला. तेव्हा तुम्ही आमचं कौतुक केलं होतं आणि आता टीका करीत आहात.”

“स्वतःचं नुकसान करून घेतलं” : सलमान खान

त्यानंतर सलमान म्हणतो, “मला वाईट याचं वाटतं की, तुम्ही स्वतःचंच नुकसान करून घेतलं आहे. जर कुणावर राग काढण्यापेक्षा स्वतःच्या कुटुंबावर प्रेम करा. भावावर, आई-वडिलांकडे लक्ष द्या. किमान एवढं तरी करा. त्यांना तुमची गरज आहे. मला वाटतं की, तुम्ही मोठं व्हावं. टॅलेंटेड आहात, चांगलं लिहिता. तुम्ही चुकीचं वागत आहात. तुम्हाला वाटतं की, मला गुडघ्यावर आणाल; पण मी रोज देवासमोर गुडघे टेकतो.”

याआधीही सलमाननं अभिनववर अप्रत्यक्ष टीका केली होती आणि त्याच्या आरोपांना उत्तर दिलं होतं. तो म्हणाला होता, “आजकाल लोक काहीही बोलतात. ते पूर्वी माझं कौतुक करीत होते; पण आता त्यांना मी आवडत नाही. पॉडकास्टवर जाऊन वेळ वाया घालवतात आणि खोटं बोलतात. हे सगळं काम नसल्यामुळे ते करीत असावेत. म्हणूनच मी त्यांना आणि अशा इतर सर्व लोकांना एवढंच सांगू इच्छितो, ‘काम करा.'”