Salman Khan Talks About Arijit Singh : ‘बिग बॉस १९’च्या मंचावर सलमान खानने अरिजीत सिंहबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ‘वीकेंड का वार’ दरम्यान अभिनेत्याने गायकाबरोबर झालेल्या त्या वादाबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.

‘बिग बॉस १९’च्या मंचावर ‘वीकेंड का वार’दरम्यान कॉमेडियन रवी गुप्ताने हजेरी लावलेली आणि त्यानेच या विषयाला हात घातला होता. सलमानसमोर रवी गमतीत म्हणाला, “मी अरिजीतसारखा दिसतो म्हणून मला इथे यायला भीती वाटत होती.” त्यावर सलमाननं हसत हसत स्पष्टीकरण दिलं. पण, सलमान व अरिजीतमध्ये नेमकं काय घडलेलं? ते जाणून घ्या…

सलमान खानची अरिजीत सिंहबद्दल प्रतिक्रिया

‘बिग बॉस १९’च्या मंचावर ‘वीकेंड का वार’ला सलमान खाननं काही वर्षांपूर्वी अरिजीत सिंहबरोबर झालेल्या वादाबद्दल स्पष्टीकरण देत, आता ते दोघे चांगले मित्र आहेत, असं म्हटलं आहे. यावेळी सलमान म्हणाला, “अरिजीत व मी चांगले मित्र आहोत. आमच्यामध्ये गैरसमज झाला होता आणि माझा गैरसमज झालेला. त्यानंतर त्यानं माझ्यासाठी गाणीसुद्धा गायली आहेत. ‘टायगर ३’मध्ये त्यानं गाणं गायलं होतं. त्यानंतर आता ‘बॅटल ऑफ गलवान’साठीसुद्धा तो गाणं गात आहे.”

सलमान खान-अरिजीत सिंहमध्ये नेमकं काय घडलेलं?

‘फ्री प्रेस जर्नल’च्या वृत्तानुसार २०१४ मध्ये सलमान पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन करीत होता. त्यावेळी अरिजीतला ‘आशिकी २’मधील ‘तुम ही हो’ या गाण्यासाठी पुरस्कार मिळालेला. त्यावेळी अरिजीत साध्या कपड्यांमध्ये आला होता. त्याबद्दल सलमान गमतीत त्याला, “तू झोपेत होतास का”, असं म्हणालेला, ज्यावर अरिजीतनं, “तुम्ही लोकांनी मला झोपवलेलं”, असं उत्तर दिलेलं. अरिजीतचं हे उत्तर सलमानला फार पटलं नाही आणि नंतर काही वर्षांनी सलमानच्या चित्रपटासाठी अरिजीतची आधी निवड झालेली असताना त्याच्या जागी दुसऱ्या गायकाला ती संधी देण्यात आली, असं म्हटलं जातं.

अरिजीत सिंहने मागितलेली सलमान खानची माफी

उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार २०१६ मध्ये आलेल्या ‘सुलतान’मध्ये आधी अरिजीतनं ‘जग घुमया’ हे गाणं गायलेलं; परंतु नंतर राहत फतेह अली खानच्या आवाजात रेकॉर्ड झालेलं हे गाणं चित्रपटात ठेवण्यात आलं. २०१६ मध्ये अरिजीतनं फेसबुकवर पोस्ट करीत सलमानची माफी मागितलेली. त्यामधून त्यानं, “कृपया माझं गाणं चित्रपटातून काढू नका. मी तुम्हाला डोक्यात ठेवून ते गायलं आहे”, असं म्हटलेलं. परंतु, नंतर त्यानं ही पोस्ट डिलीट केली; मात्र ही पोस्ट डिलीट केली जाण्याआधीच व्हायरल झाली होती.