Sanjay Kapur’s Sister Mandira Blame Priya Sachdev : बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचे एक्स पती संजय कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या प्रॉपर्टीवरून कुटुंबात वाद सुरू आहे. त्यांची तिसरी पत्नी प्रिया सचदेव आणि करिश्मा कपूरची मुलं यांच्यात ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून वाद सुरू आहे. अशातच आता संजय यांची बहिणी मंदिरा कपूर स्मिथ यांनी संजय आणि करिश्मा यांचं नातं तुटण्यामागे प्रिया जबाबदार होती असं म्हटलं आहे.

संजय कपूर यांच्या बहिणी मंदिरा कपूर स्मिथ यांनी पत्रकार विक्की लालवानी यांच्याशी बोलताना मंदिरा म्हणाल्या, “मला संजय आणि प्रिया यांच्याविषयी आधीच माहिती होती आणि मला हे मान्य नव्हतं. लोलो (करिश्मा) आणि माझा भाऊ संजय यांच्यात तेव्हा चांगलं नातं होतं. कियानचा नुकताच जन्म झाला होता. माझा भाऊ आपल्या मुलांवर खूप प्रेम करत होता. एखाद्या नात्यात येऊन त्यांचं नातं मोडणं हे चुकीचं आहे. एक सुखी कुटुंब मोडू नये आणि करिश्मा देखील हे नातं टिकवण्यासाठी खूप मेहनत करत होती. तिला जे सहन करावं लागलं, ते खूप अन्यायकारक होतं.”

संजय आणि प्रियाच्या लग्नाला वडिलांचा विरोध होता : मंदिरा

मंदिरा कपूर यांनी पुढे सांगितलं की, संजय कपूर आणि प्रिया सचदेव यांच्या नात्याला संपूर्ण कुटुंब आणि वडिलांचा विरोध होता. त्या म्हणाल्या, “संजयने मला खूप समजावलं की, ‘प्रिया माझ्यासाठी योग्य आहे, ती अशी आहे, तशी आहे’ वगैरे वगैरे. एकदा आम्ही पूर्ण कुटुंब गोव्यात गेलो होतो. तेव्हा वडिलांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की, ‘संजयने तिच्याशी लग्न करूच नये. मला तिचा चेहराही पाहायचा नाही आणि त्यांना मुलं होऊ नयेत.’ म्हणून कुणीच त्यांच्या लग्नाला पाठिंबा दिला नव्हता. मी फक्त भावावर प्रेम होते म्हणून त्याच्या पाठीशी उभी राहिले. पण तेव्हा मी लोलो (करिश्मा) आणि संजयचं नातं टिकवायला हवं होतं.”

तेव्हा करिश्मासाठी ठामपणे उभं राहायला हवं होतं : मंदिरा

जेव्हा मंदिरा यांना विचारण्यात आलं की, त्या कठीण काळात करिश्मा कपूरने संपर्क केला होता का, तेव्हा मंदिरा यांनी कबूल केलं की त्यांच्या दोघींमध्ये तेव्हा संवादच झाला नाही. मंदिरा म्हणाल्या, “त्या काळात आमचं बोलणंच बंद होतं… मला वाटतं ती माझ्यावर रागावलेलीही होती आणि याबद्दल मी तिला दोष देत नाही. तेव्हा मला तिच्यासाठी ठामपणे उभं राहायला हवं होतं. कारण ती माझी मैत्रीण होती. माझी भूमिका अजून ठाम असायला हवी होती. खरंच. मला माहिती नाही, मी वेगळं काय करू शकले असते, पण काहीतरी नक्कीच करायला हवं होतं.”

संजय आणि प्रिया यांच्या लग्नासाठी मी गेलेच नाही : मंदिरा

पुढे मंदिरा यांनी सांगितलं, संजय आणि प्रिया यांच्या लग्नासाठी त्या आणि त्यांची बहीण न्यूयॉर्कलाही गेल्या नाहीत. त्या म्हणाल्या, “आम्ही दोघीही लग्नाला गेलो नाही. आम्ही या लग्नाला पाठिंबा देऊ शकत नाही, यावर ठाम होतो. आमचे वडीलही त्याला म्हणाले होते, ‘हे लग्न करू नकोस’ असं म्हणाले होते. आमच्या आईला मात्र लग्नासाठी जावं लागलं, कारण ती संजयबरोबर राहत होती. तिला वाईट वाटलं की, आम्ही गेलो नाही. पण आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम होतो.”