Vadh Movie review : कथेच्या बाबतीत मार खाणारा पण, दर्जेदार अभिनयाने उचलून धरलेला थरारपट | sanjay mishra and neena gupta starrer vadh movier review read in marathi | Loksatta

Vadh Movie review : कथेच्या बाबतीत मार खाणारा पण, दर्जेदार अभिनयाने उचलून धरलेला थरारपट

संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांचा चित्रपट : ‘वध’ मुव्ही रिव्यू

Vadh Movie review : कथेच्या बाबतीत मार खाणारा पण, दर्जेदार अभिनयाने उचलून धरलेला थरारपट
'वध' चित्रपट समीक्षण (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

चुकीची किंवा अनैतिक गोष्टसुद्धा कशी योग्य ठरू शकते हे सिद्ध करणारे बरेच चित्रपट गेल्या काही महिन्यात आले, पण त्यापैकी ‘दृश्यम’सारखाच चित्रपट याबाबतीत यशस्वी ठरला. साधारण थोड्याफार त्याच वाटेवर जाणारा, ‘हत्या’ आणि ‘वध’ यामधला फरक अधोरेखित करणारा ‘वध’ हा चित्रपट मात्र काही प्रमाणात यशस्वी ठरला आहे. ‘दृश्यम’सारखे चक्रावून टाकणारे ट्विस्ट नसले तरी हा चित्रपट तुम्हाला शेवटपर्यंत बांधून ठेवतो. काही प्रमाणात चित्रपटाच्या कथेचा आणि पुढे घडणाऱ्या घटनांचा तुम्ही अंदाज बांधू शकता पण चित्रपट कोणत्याच बाबतीत तुम्हाला निराश करत नाही.

मध्यप्रदेशमधील छोट्याशा शहरात राहणारे सामान्य कुटुंबातील शिक्षक शंभूनाथ मिश्रा आणि त्यांची पत्नी मंजू मिश्रा यांची ही कहाणी. मुलाच्या हट्टाखातर पैशाची जमवाजमव करून मुलाला परदेशात शिक्षणासाठी पाठवल्यावर हे दाम्पत्य अत्यंत काटकसरीने संसार करत असतं. जे खाऊ ते मेहनतीचं खाऊ या तत्वांवर चालणाऱ्या या जोडप्याच्या आयुष्यात एक अशी घटना घडते ज्यामुळे त्यांचं आयुष्य पणाला लागतं. त्यातून बाहेर पाडण्यासाठी हे सामान्य जोडपं जी असामान्य गोष्ट करतं आणि त्या गोष्टीचं नेमकं त्यांना कसं फळ मिळतं हे एकंदर तुम्हाला या चित्रपटात पाहायला मिळतं.

आणखी वाचा : “मी कोणत्या अँगलने हीरो…” ‘दृश्यम’मध्ये गायतोंडेची भूमिका साकारणाऱ्या कमलेश सावंत यांचा खुलासा

चित्रपटाची कथा खरंतर अत्यंत साधी, सरळ आहे, पण ती ज्या पद्धतीने सादर केली आहे त्यामुळे कथा अगदी कॉमन असूनही आपण काहीतरी वेगळं बघतोय असं वाटत राहतं. शिवाय चित्रपटाचं नाव ‘वध’ आहे आणि ट्रेलरमधूनही त्याबद्दलच दाखवण्यात आलं आहे, पण तो वध कुणाचा, त्यामागची पार्श्वभूमी, त्याचे पडसाद आणि कायद्याच्या कचाट्यातून बाहेर पडण्यासाठी त्या जोडप्याची तळमळ हे सगळं तुम्हाला चित्रपट बघतानाच स्पष्ट होईल. सनी देओलने त्याच्या गदरमधील हँडपंप उखडून घेऊन जाण्याच्या सीनमागे एक स्पष्टीकरण दिलं होतं. एका मुलाखतीत सनीने सांगितलं होतं की सामान्य माणसाची ताकद ही कधीच कुणी ओळखू शकलेलं नाही आणि जेव्हा जीवन मरणाचा किंवा स्वाभिमान, आब्रू जपायचा प्रश्न त्याच्यासमोर उभा ठाकतो तेव्हा मात्र त्या सामान्य माणसातील असामान्य ताकदीचं दर्शन लोकांना घडतं. सनीच्या स्पष्टीकरणाप्रमाणेच ‘वध’सुद्धा हीच गोष्ट अधोरेखित करतो.

चित्रपटातील काही सीन्स अक्षरशः अंगावर येणारे आहेत, संगीत हे कथेला साजेसं आहे. कुठेही अनावश्यक गाणी नसल्याने चित्रपटाचं गांभीर्य कायम राहतं. छोट्या मोठ्या विनोदामुळे तेवढ्यापुरतं वातावरण हलकं फुलकं करण्याचा प्रयत्न चित्रपटात झाला आहे. काही ठिकाणी कथा खुलवण्यात आणि आणखी उत्तम सस्पेन्स कायम ठेवण्यात चित्रपट थोडा कमी पडला आहे. शिवाय काही ठिकाणी टिपिकल पद्धतीने पात्रांची मांडणी झाल्याने त्या पात्राचं गांभीर्य कायम राहत नाही. खासकरून प्रजापती पांडे हे खलनायकी पात्र आणखी उत्तमरित्या लिहिता आणि सादर करता आलं असतं तर त्याचा आणखी वेगळा प्रभाव लोकांवर पडला असता. या काही गोष्टींकडे कानाडोळा केला तर १ तास ५० मिनिटांचा हा चित्रपट कुठेही खेचल्यासारखा वाटत नाही हे याच्या पटकथेचं यश.

या चित्रपटाची सर्वात जमेची बाजू म्हणजे छायाचित्रीकरण आणि अभिनय. ज्या पद्धतीने मध्यप्रदेशची एक वेगळीच बाजू आपल्यासमोर सादर केली आहे ते फारच उत्तम जमून आलं आहे. अभिनयाच्या बाबतीत तर चित्रपटाने एक वेगळीच ऊंची गाठली आहे. मानव वीजने साकारलेला पोलिस अधिकारी जितका वाईट आहे तितकाच चांगलासुद्धा आहे आणि त्या पात्राला मानव वीज यांनी योग्य न्याय दिला आहे. प्रजापती पांडेची भूमिका साकारणाऱ्या सौरभ सचदेवाची भूमिका लहान असली तरी चित्रपटावर वेगळाच प्रभाव टाकणारी आहे. नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांच्या जबरदस्त अभिनयाने या चित्रपटाला एक वेगळंच महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यांची देहबोली, भाषेवरची पकड, संवादफेक आणि पात्राशी एकरूप होणं यामुळेच हा चित्रपट उजवा ठरतोय.

हतबल शिक्षक ते परिस्थितीमुळे बनलेला गुन्हेगार ही अभिनयाची रेंज फक्त आणि फक्त संजय मिश्रासारखा अभिनेताच पडद्यावर दाखवू शकतो. त्यांना उत्तम साथ दिली आहे ती अत्यंत साधी, करारी आणि नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणाऱ्या मंजू मिश्रा हे पात्र साकारणाऱ्या नीना गुप्ता यांनी. कदाचित हे दोघे कलाकार नसते तर या चित्रपटाला तितक्या उत्तमरीत्या प्रेक्षकांनी स्वीकारला नसता. चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक जसपाल सिंग संधु आणि राजीव बर्नवाल यांचा हा पहिलाच दिग्दर्शक म्हणून चित्रपट असला तरी तो त्यांनी उत्तमरित्या बांधला आहे आणि निर्माण होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला समाधानकारक उत्तरदेखील दिलं आहे. पूर्णपणे आर्ट फिल्मही नाही आणि पूर्णपणे कमर्शियल फिल्मही नाही, पण दोन्हीमधील थोड्या थोड्या गोष्टी घेऊन ‘वध’ आपल्यासमोर सादर करण्यात आला आहे. अशा प्रकारचे चित्रपट आवडणाऱ्या लोकांनी हा चित्रपट एकदा बघायला नक्कीच हरकत नाही.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 11:05 IST
Next Story
“तुम्ही निर्लज्ज…” जेव्हा नीना गुप्ता यांच्या मित्रानेच चित्रपटात घेण्यास दिला होता नकार