Satish Shah Passes Away : ‘साराभाई वर्सेस साराभाई’ फेम ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचं वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झालं आहे. निर्माते-दिग्दर्शक अशोक पंडित यांनी किडनी निकामी झाल्यामुळे सतीश शाह यांचं निधन झाल्याची दु:खद माहिती सोशल मीडियाद्वारे दिली. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सतीश शाह यांच्या निधनानंतर संपूर्ण बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे. “सतीशजी तुम्ही माझ्या पहिल्या सिनेमात माझे ऑनस्क्रीन वडील होतात…मी खूप नशीबवान होते म्हणून मला तुमच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. आज खरंच खूप दु:ख होतंय….तुमच्या कुटुंबीयांबरोबर माझ्या सहवेदना आहेत” असं जिनिलीया देशमुखने पोस्ट शेअर करत म्हटलं आहे.

genelia
जिनिलीया देशमुखने सतीश शाह यांना वाहिली श्रद्धांजली

“सतीश सर…तुमच्यामुळे कायम सेटवरचं वातावरण प्रसन्न असायचं. तुम्ही ‘साथिया’ या माझ्या पहिल्याच सिनेमात ऑनस्क्रीन वडिलांची भूमिका केली होती. तुमचा शांत, हसतमुख स्वभाव कायम लक्षात राहील. तुम्ही साकारलेल्या इंद्रवर्धन साराभाई या भूमिकेवर संपूर्ण देशाने प्रेम केलं. तुमच्या आठवणी सदैव आमच्या स्मरणात राहतील…तुम्हाला कायम मिस करू! ओम शांती” असं म्हणत अभिनेता विवेक ओबेरॉयने सतीश शाह यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

याचबरोबर दिग्दर्शक फराह खान, करण जोहर यांच्यासह अनेक बॉलीवूड कलाकारांनी सतीश शाह यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे.

vivek
विवेक ओबेरॉयची भावुक पोस्ट

सतीश शाह यांच्याबद्दल….

सतीश रविलाल शाह यांचा जन्म गुजरातमधील मांडवी येथे झाला होता. ते झेवियर्स कॉलेजचे पदवीधर होते आणि त्यानंतर त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये शिक्षण घेतलं. सतीश शाह यांनी जवळपास २५० हून अधिक चित्रपट आणि असंख्य टेलिव्हिजन शोमध्ये काम केलेलं आहे. २००८ मध्ये त्यांनी कॉमेडी सर्कस या शोचे सह-परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली होती आणि २०१५ मध्ये फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया सोसायटीचे सदस्य म्हणून काम केलं होतं.