Vivek Oberoi on controversy involving Aishwarya Rai and Salman Khan: विवेक ओबेरॉय हा सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. तो अनेकदा अनेक मुलाखतींमध्ये त्याच्या करिअरमधील किस्से तसेच त्याच्या बिझनेसबद्दलही वक्तव्य करतो.

२००३ मध्ये विवेक ओबेरॉयने एका पत्रकार परिषदेत सलमान खानवर अनेक आरोप केले होते. ऐश्वर्या रायमुळे सलमान खान मला धमकी देत आहे, असे त्याने वक्तव्य केले होते. कारण असे म्हटले जात होते, सलमान खानबरोबर ब्रेकअप केल्यानंतर ऐश्वर्या राय विवेक ओबेरॉयला डेट करत होती.

त्यानंतर विवेक ओबेरॉयला त्याच्या करिअरमध्ये संघर्ष करावा लागला. अभिनेत्याने नुकतेच याबद्दल वक्तव्य केले आहे. याबरोबरच तो प्रेमभंगाला कसे सामोरे गेला, याबद्दल त्याने वक्तव्य केले आहे.

“या भीतीत मला…”

विवेकने नुकताच प्रखर गुप्ताशी संवाद साधला. या मुलाखतीत प्रेमभंगाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन काय आहे, यावर त्याने वक्तव्य केले. अभिनेता म्हणाला, “मी कायमच खूप संवदेनशील, भावूक असणारा व्यक्ती आहे. माझा प्रेमभंग होईल या भीतीत मला जगायचे नाही. कारण याआधीच माझा प्रेमभंग झाला आहे. तो काळ मी जगलो आहे, त्याचा मला अनुभव आहे.

“तो खूप भीतीदायक, एकाकी पाडणारा असा अनुभव होता. मला कायम माझ्या अवतीभोवती माणसे असावी असे वाटते. माझे माझ्या नात्यांवर प्रेम आहे. मी नातेसंबंधावर विश्वास ठेवणारा, कुटुंबाभिमुख असा व्यक्ती आहे.”

अभिनेता पुढे म्हणाला, “प्रेमभंगानंतर मी स्वत:ला सावरले. थोडा स्थिर झालो. त्यानंतर मला त्या दु:खातून पुन्हा जायचे नव्हते, त्यामुळे मी एकटा राहू लागलो. मला तो अनुभव पुन्हा घ्यायचा नाही. माणूस म्हणून आपण सगळेच त्यातून जातो. पण, एकटं राहणं हा माझा स्वभाव नाही. मी माझ्या स्वभावाविरुद्ध वागत होतो. पाण्यातून मासा बाहेर काढल्यावर जसे होते, तसेच मला वाटत होते. पण, तुम्हाला जर पुन्हा प्रेम अनुभवयाचे असेल तर स्वत:ला तितके खुलेपणाने स्वीकारले पाहिजे.”

“जेव्हा अडचणी समोर…”

२००३ मधील सलमान खान बरोबरच्या भांडणाबद्दल विवेक म्हणाला, “जेव्हा अडचणी समोर येतात तेव्हा त्या खूप मोठ्या वाटतात, ही विचित्र गोष्ट आहे. जेव्हा मी माझ्या मुलांच्या समस्या बघतो तेव्हा मी हसतो, कारण त्यांच्या समस्या या समस्या नसतात. अगदी तसेच मला वाटते, जेव्हा देव आपल्या समस्या बघतो तेव्हा तो आपल्यावर हसत असेल. तो विचार करत असेल, बाळा ही तर खूप छोटी गोष्ट आहे, मी तुला मजबूत बनवेन. हा दृष्टिकोन आपल्याला नंतर सुचतो. “

“आई-वडील आपली काळजी करत…”

“आता मी त्याबद्दल विचार करतो तर मला त्या गोष्टी बालिश वाटतात. एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया देणे किंवा असणे ही गोष्ट मला आता विनोदी वाटते. त्यावेळी एक भीती होती किंवा कडवटपणा होता, त्यामुळे त्या सगळ्याकडे बघणे खूप अवघड वाटायचे. मी ज्या परिस्थितीतून, गोष्टींतून गेलो ते आता मी विसरलो आहे.”

“आई-वडील आपली काळजी करत असल्याचे पाहणे हे सगळ्यात अवघड होते असेही विवेक म्हणाला. तो म्हणाला, “आईच्या डोळ्यात अश्रू पाहणे, वडिलांच्या चेहऱ्यावर काळजी पाहणे हे विसरणे अवघड आहे. या गोष्टी आठवणीत राहतात. पण, तुम्हाला आयुष्यात पुढे जावे लागते. आनंदी क्षण लक्षात ठेवावे लागतात, नाहीतर तुम्ही नकारात्मक होता.”

“मीच का?”

या मुलाखतीत त्याला विचारले की, त्याच्याबरोबर अन्याय झाला आहे असे कधी वाटले आहे का? यावर अभिनेता म्हणाला, “मीच का? ही माझ्या आयुष्यातील महत्वाची संज्ञा आहे. मी अशा टप्प्यावर होतो, जिथे माझ्याबरोबर कोणीही काम करण्यास तयार नव्हते. ज्या प्रोजेक्टमध्ये मी काम करणार होतो, त्या चित्रपटांतून मला काढून टाकले होते. इतकेच नाही तर मला धमकी देणारे फोन येत होते.

“मला दोन गोष्टींची…”

“कधी मला, कधी माझ्या बहिणीला, माझ्या आई-वडिलांना असे हे फोन यायचे. माझ्या खासगी आयुष्यातसुद्धा त्यावेळी खूप गोंधळ झाला होता. मी नैराश्यात गेलो होतो. दरम्यानच्या काळातच माझ्या आईच्या मांडीवर डोके ठेवून मी खूप रडायचो.”

पुढे अभिनेता म्हणाला, “मी सतत विचारत राहायचो की हे सर्व माझ्या बाबतीतच का होत आहे? पण, माझ्या आईकडे एका वेगळ्याच पातळीचा संयम होता. ती माझे सर्व म्हणणे ऐकून घ्यायची. माझ्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवायची आणि मला एक प्रश्न विचारायची की, जेव्हा तुला पुरस्कार मिळतात, तू अवॉर्ड जिंकतोस, तुला नवनवीन चित्रपटांच्या ऑफर्स येतात, चाहत्यांची गर्दी तुझ्या नावाने ओरडत असते, तेव्हा तू हा प्रश्न स्वत:ला विचारतोस का? त्यानंतर मी माझे रडणे थांबवायचो, कारण माझ्याकडे उत्तर नसायचे. ती मला लहान मुलांच्या कर्करोगाच्या दवाखान्यात घेऊन गेली.

“त्यावेळी मला दोन गोष्टींची जाणीव झाली की, माझ्या समस्या खूप मोठ्या नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक मूल त्या वेदनेतही हसत होते”, अशा प्रकारे विवेकने तो प्रेमभंगातून, नैराश्यातून कसा बाहेर आला हे सविस्तरपणे सांगितले.

विवेक ओबेरॉय लवकरच रामायण या चित्रपटात दिसणार आहे.