Shabana Azmi Family: ज्येष्ठ गीतकार व लेखक जावेद अख्तर यांनी आधी हनी इराणींशी आणि नंतर शबाना आझमींशी लग्न केलं. जावेद यांना हनी इराणींपासून फरहान अख्तर व झोया अख्तर ही दोन अपत्ये आहेत. जावेद यांना शबानापासून मुलं नाहीत. शबाना यांचं सावत्र मुलांशी चांगलं नातं आहे.
जावेद अख्तर व हनी इराणी यांचा मुलगा फरहान अख्तरचं पहिलं लग्न अधुना भबानीशी झालं होतं. १७ वर्षांच्या संसारानंतर त्यांचा २०१७ मध्ये घटस्फोट झाला. फरहानला अधुनापासून शाक्य व अकिरा या दोन मुली आहेत. घटस्फोटानंतर पाच वर्षांनी म्हणजेच २०२२ मध्ये फरहानने शिबानी दांडेकरशी दुसरं लग्न केलं.
शबाना आझमी यांच्या कुटुंबात दोन मराठमोळ्या अभिनेत्री आहेत. शबाना यांची सून व वहिनी दोघीही मराठी आहेत. फरहान अख्तरची दुसीर बायको शिबानी ही मराठी आहे. ती अभिनेत्री अनुषा दांडेकरची बहीण आहे. त्याचबरोबर शबाना आझमी यांची वहिनीदेखील मराठी आहे.
शबाना आझमींचे भाऊ बाबा आझमी यांनी तन्वी यांच्याशी प्रेमविवाह केला. तन्मी यांचा जन्म महाराष्ट्रातील एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांनी बंडखोरी करून मुस्लीम असलेल्या बाबा आझमींशी लग्न केलं तेव्हा काय घडलं होतं, त्याबद्दल एका मुलाखतीत सांगितलं होतं.
तन्वी आझमी लग्नाबद्दल काय म्हणाल्या होत्या?
‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत तन्वी यांना, ‘त्या वाढत्या वयात बंडखोर होत्या का?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर “मी खूप आज्ञाधारक मुलगी होते, पण नंतर अचानक काहीतरी घडलं. माझ्या रक्तात सुप्त बंडखोरपणा होता. त्याचाच परिणाम म्हणून मी बंड करून लग्न केलं. एका महाराष्ट्रीय ब्राह्मण मुलीने मुस्लीम पुरुषाशी लग्न केल्यामुळे जणू काही संपूर्ण मुंबईत उद्रेक झालाय अन् जगाचा अंत झालाय असं वाटत होतं. खरं तर माझ्यासाठी तेव्हापासून बंडखोरी सुरू झाली आणि ती कायम राहिली,” असं तन्वी आझमी म्हणाल्या होत्या.
तन्वी आझमी या कवी आणि गीतकार कैफी आझमी आणि शौकत आझमी यांच्या सून आहेत. त्या सिनेमॅटोग्राफर बाबा आझमी यांच्या पत्नी व शबाना आझमी यांच्या वहिनी आहेत. इतक्या मोठ्या कुटुंबाचा भाग असल्याने कधी दबाव जाणवला का? असं विचारल्यावर तन्वी म्हणालेल्या, “अशा कुटुंबाचा एक भाग असणं खूप छान वाटतं, पण त्यामुळे मला कधीच त्रास झाला नाही. इतरांनी जे मिळवलं, ते मला मिळवावं लागेल, असं कधीच वाटलं नाही. त्यांचा वेगळा प्रवास आहे, जोपर्यंत मला चांगलं काम मिळत राहील तोवर मी माझ्या प्रवासात आनंदी आहे. माझं लक्ष्य माझं काम आहे. माझ्या कुटुंबातील कोणत्या व्यक्तीने किती काम केलं याकडे माझं कधीच लक्ष नव्हतं. आपल्या सर्वांच्या जमेच्या बाजू असतात, तसाच कमकुवतपणाही असतो म्हणून मी कधीही स्वतःची तुलना इतरांशी केली नाही. माझ्या कुटुंबातील यश मिळविणाऱ्यांमुळे मी त्यांच्याहून कमी आहे, असं वाटलं नाही. मला त्या सर्वांचा खूप अभिमान वाटतो.”