Met Gala 2025 : सध्या संपूर्ण जगभरात ‘मेट गाला’ रेड कार्पेट सोहळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यंदा या कार्यक्रमात शाहरुख खान, दिलजीत दोसांझ, कियारा अडवाणी यांसारख्या कलाकारांनी दणक्यात पदार्पण केलं. ‘मेट गाला’च्या रेड कार्पेटवर जाणारा शाहरुख खान पहिला भारतीय अभिनेता ठरला आहे. या सगळ्याच सेलिब्रिटींच्या लूकच सोशल मीडियावर सध्या भरभरून कौतुक करण्यात येत आहे.

मात्र, या कार्यक्रमादरम्यान घडलेला एक अनपेक्षित योगायोग सध्या चर्चेत आला आहे. बॉलीवूडचा ‘किंग खान’ पहिल्यांदाच या सोहळ्याला गेला होता, तर, ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा ‘मेट गाला’ येथे उपस्थित राहण्याची ही पाचवी वेळ होती. ती गेल्या अनेक वर्षांपासून या कार्यक्रमाला उपस्थित राहत आहे. या दोघांनीही ‘मेट गाला’मध्ये हटके लूक केला होता. पण, त्यांच्या चाहत्यांना दोघांच्याही लूकमध्ये एक वेगळंच साम्य आढळलं आहे.

शाहरुख खान आणि प्रियांका चोप्राकडून नकळतपणे १९ वर्षांपूर्वीचा ‘तो’ लूक यंदाच्या ‘मेट गाला’मध्ये रिक्रिएट झाला आहे. यावर्षी शाहरुख खान ‘मेट गाला’मध्ये काळ्या रंगाच्या लाँग लेंग्थ फ्लोअर कोटमध्ये दिसला. तर, प्रियांकाने पोलका गाऊन ड्रेस घातला होता. शाहरुख आणि प्रियांकाचा हा लूक पाहून नेटकऱ्यांना २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डॉन’ या सुपरहिट चित्रपटाची आठवण झाली.

सध्या शाहरुख-प्रियांकाचे १९ वर्षांपूर्वीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. २००६ मध्ये ‘डॉन’ सिनेमाचं प्रमोशन करताना हे फोटो काढण्यात आले होते. त्यावेळी सुद्धा शाहरुखने काळ्या रंगाचा सूट तर, प्रियांकाने पोलका डॉट ड्रेस घातला होता. नेटकऱ्यांनी हे जुने फोटो व्हायरल करून सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

दरम्यान, शाहरुख खान आणि प्रियांका चोप्राकडून नकळत हा लूक पुन्हा एकदा रिक्रिएट झाला आहे. या दोन्ही लूकमधील अचूक साम्य ओळखून नेटकऱ्यांनी हे १९ वर्षांपूर्वीचे फोटो व्हायरल केले आहेत. प्रत्यक्षात यंदाच्या रेड कार्पेटवर शाहरुख-प्रियांका एकमेकांना भेटलेले नाहीत आणि त्यांचे एकत्र कोणतेच फोटो नाहीयेत. प्रियांका तिचा पती निक जोनाससह या कार्यक्रमात पोहोचली होती.

याशिवाय शाहरुख आणि प्रियांका यांनी ‘डॉन २’मध्ये शेवटची स्क्रीन शेअर केली होती, पण त्यानंतर ते कोणत्याही चित्रपटात एकत्र दिसले नाहीत.