बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या ‘किंग’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. ‘किंग’मधून शाहरुख खान व त्याची मुलगी सुहाना खान पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. ‘द आर्चीज’नंतर सुहाना आता लवकरच ‘किंग’मधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. अशातच सध्या ही बाप-लेकीची जोडी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

सुहाना खानने नुकतंच एका नामांकित ब्रँडच्या जाहिरातीसाठी फोटोशूट केलं आहे, ज्याचे फोटो सोशल मीडियावर तिने पोस्ट केले आहेत. सुहानाच्या या फोटोंनी तिच्या चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. महत्त्वाचं म्हणजे तिने तिचे वडील शाहरुख खानचंसुद्धा लक्ष वेधलं आहे. सुहानाचे हे नवीन फोटो पाहून शाहरुख खानला लेकीचं कौतुक वाटत आहे. त्याने तिच्या पोस्टवर ‘लुकिंग सो गूड’ अशी कमेंट केली आहे. सुहानानेही वडिलांनी केलेल्या कमेंटला उत्तर देत ‘लव्ह यू’ असं म्हटलं आहे. यासह सुहानाच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांनीही कमेंट करत तिचं कौतुक केल्याचं दिसतं.

सुहाना खानबद्दल बोलायचं झालं तर तिने जोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर आता ती लवकरच तिच्या वडिलांसह ‘किंग’ या आगामी चित्रपटातून झळकणार आहे. या चित्रपटातून ती पहिल्यांदाच तिच्या वडिलांसह काम करणार आहे, त्यामुळे शाहरुख खान व सुहाना यांना एकत्र चित्रपटातून पाहण्यासाठी त्यांचे चाहतेही उत्सुक असल्याचं दिसतं.

शाहरुख खानने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम करत त्याच्या हटके अंदाजाने प्रेक्षकांच्या मनामध्ये जणू घर केलं आहे, त्यामुळे तो बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याच्यानंतर अभिनेत्याच्या मुलांनीसुद्धा या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची मुलगी सुहाना अभिनेत्री म्हणून काम करत आहे, तर मोठा मुलगा आर्यन खान लवकरच दिग्दर्शनामध्ये पदार्पण करणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहरुख खानने मागे एका कार्यक्रमामधून त्याच्या चाहत्यांना मुलगी सुहाना खान व मुलगा आर्यन खान यांनासुद्धा त्याच्याप्रमाणेच पाठिंबा देण्याचं आवाहन केलं होतं. अभिनेता म्हणाला होता, “आजवर तुम्ही सर्वांनी माझ्यावर जेवढं प्रेम केलं आहे, त्याच्या किमान ५० टक्के जरी माझ्या मुलांवर केलं तरी माझ्यासाठी ते खूप असेल.”