Shah Rukh Khan’s Om Shanti Om fire scene: अभिनेता शाहरुख खान हा बॉलीवूडचा किंग खान म्हणून ओळखला जातो. ‘दिल से’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’ ते ‘जवान’, ‘पठाण’ अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांसाठी अभिनेता ओळखला जातो.
‘ओम शांती ओम’ या दीपिका पादुकोणबरोबरच्या चित्रपटालादेखील मोठी लोकप्रियता मिळाली. हा चित्रपट प्रदर्शित होऊन दोन दशकांचा काळ उलटला तरीही या चित्रपटाचा आजही मोठा चाहतावर्ग आहे. या चित्रपटातील एक सीन आहे, जिथे ओम शांतीप्रियाला आगीतून वाचवण्याचा प्रयत्न करतो. तो सीन मुंबईतील मुकेश मिल्स येथे शूट झाला होता.
आनंद महिंद्रा काय म्हणाले?
येझदी रोडस्टर मोटरसायकल(Yezdi Roadster motorcycle)च्या २०२५ मधील नवीन लाँचसाठी महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा, अनुपम थरेजा आणि बोमन इराणी मुकेश मिल्स येथे एकत्र आले होते. यावेळी आनंद महिंद्रा यांनी मुकेश मिल्सची आठवण सांगितली. ते म्हणाले, “ओम शांती ओम या चित्रपटाचे शूटिंग येथे झाले होते. शाहरुख खानने तो सीन येथेच शूट करावा, असा निर्णय घेतला होता. कदाचित या मिलच्या इतिहासाने तो प्रेरित झाला असेल. या ठिकाणाला खरंच आग लागली होती. हे ठिकाण संपूर्ण नष्ट झाले होते.
पुढे ते येझदी मोटारसायकल आणि शाहरुखचा संबंध सांगत असेही म्हणाले, “शाहरुख आनंदी असेल कारण त्याने ‘कभी हा कभी ना चित्रपटात येझदी मोटारसायकलचा वापर केला होता. त्याला हा ब्रँड आवडतो.”
‘हिंदी रश’ला दिलेल्या मुलाखतीत, अॅक्शन-दिग्दर्शक शाम कौशल यांनी चित्रपटातील या अॅक्शन सीनबद्दल वक्तव्य केले होते. ते म्हणालेले, “‘ओम शांती ओम’मधील आग लागलेला जो सीन आहे, त्यामध्ये कोणताही व्हीएफएक्स वापरला गेला नव्हता. आम्हाला त्या सेटवर आग लावावी लागली. त्यात शाहरुख खान, दीपिका पादुकोण , तीन कॅमेरामन आणि माझ्या युनिटचे सुमारे ६० सदस्य सेटवर होते. आग लागलेल्या सेटवर एकूण १०० लोक होते.”
शाम कौशल असेही म्हणाले, “त्या शूटिंग दरम्यान मी खूप तणावात होतो. आगीचा सीन शूट करताना खूप काळजी घ्यावी लागत होती.आग लावल्यानंतर काही सेकंदातच आग विझवावी लागत होती. जर कोणी कुठेही चूक केली असती तर त्याचा शेवट भयानक झाला असता. त्यादरम्यान, मी सेटवर खूप वेळा बाजूला जाऊन रडलो होतो. मला हृदयविकाराचा झटका येईल, असे वाटत होते.”
फराह खान दिग्दर्शित ‘ओम शांती ओम’ हा चित्रपट २००७ मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. या चित्रपटातून दीपिका पदुकोणने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. शाहरुख खान आणि दीपिकाबरोबरच या चित्रपटात श्रेयस तळपदे, अर्जुन रामपाल आणि किरण खेर हे कलाकारदेखील प्रमुख भूमिकेत होते.